जातीचे बंधन झुगारून दिव्यांग जोडपे विवाहबद्ध; इतर खर्चाला फाटा देत साध्या पध्दतीने विवाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जातीचे बंधन झुगारून दिव्यांग तरुण जोडपे नुकतेच विवाहबद्ध झाले. या विवाहातून वधू आशा सोनटक्के, वर सचिन नागपुरे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. हा विवाह सोहळा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून झालेला असून, विवाह नोंदणी अधिकारी पी.पी. कनसे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आशा सोनटक्के व सचिन नागपुरे हे उच्चशिक्षित असून त्यांनी इतर खर्चाला फाटा देऊन हा विवाह कायदेशीर व साध्या पध्दतीने केला. अशा पध्दतीने विवाह होणे काळाची गरज असून, या विवाहासाठी आंतरजातीय व अंतर दिव्यांग विवाह म्हणून शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर अनुदान मिळवून देण्याचे आश्‍वासन समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी दिले. विवाह स्वागतावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे, तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, कार्याध्यक्ष हमीद शेख, शहराध्यक्ष विजय हजारे, महिला अध्यक्ष सय्यद गजाला, शहर संघटक सोमनाथ पवार, पोपट शेळके, शितल गुंदेचा, जिल्हा सचिव संतोष जाधव आदि उपस्थित होते. या विवाहासाठी संघटनेचे शहर संघटक सोमनाथ पवार यांची विशेष सहकार्य लाभले.