
मुंबईत घडणाऱया दुर्घटनांमध्ये बचावकार्य वेगाने करता यावे यासाठी पालिकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कोर्समध्ये आता सुरक्षारक्षकांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. मुंबई विद्यापीठ आणि पालिकेच्या माध्यमातून हा कोर्स सुरू आहे. या कोर्सनंतर उमेदवारांना मुंबई विद्यापीठ संलग्न अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
पालिकेने राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद बल (एनडीआरएफ)च्या धर्तीवर शहर आपत्ती निवारण बल तयार केले आहे. यात 200 सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. या तुकडीला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पदव्युत्तर उमेदवारांना यात सहभागी होता येत आहे. याच धर्तीवर पालिकेने सुरक्षारक्षकांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शिक्षणाच्या अटीबाबत सूट देण्याबाबत निर्णयही घेण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत सुरक्षारक्षकांवर केवळ मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असायची, मात्र बदलत्या काळानुसार आता दुर्घटनांचे वाढलेले प्रमाण पाहता प्रत्येकाने बचावकार्यात सहभाग घेणे अनिवार्य बनले आहे. दुर्घटना घडल्यावर सुरक्षारक्षक प्रथम प्रतिसाद देऊ शकतात. त्यामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.
तज्ञांकडून मार्गदर्शन
एक वर्षाच्या पार्टटाइम कोर्समध्ये उमेदवारांना तज्ञांकडून मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये पालिकेच्या अग्निशमन दलातील तज्ञ, आपत्ती व्यवस्थापन विभागातील तज्ञ, एनडीआरएफ, भाभा अणु संशोधन केंद्रांतील तज्ञ आदींकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
असे देणार प्रशिक्षण
सुरक्षारक्षकांना देण्यात येणाऱया प्रशिक्षणातील अभ्यासक्रमात केवळ बचावकार्य आपत्ती व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. आपत्ती आल्यानंतर नुकासानीचे प्रमाण कमी करण्यासाठी, तीव्रता कमी करण्यासाठी, आपत्तीचा धोका ओळखणे, शक्य तितक्या उपाययोजना करणे अशा बाबींचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. वित्तहानी, जीवितहानी कमी करण्याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाईल.


























































