
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे कार्यरत रहायचं याची चांगली माहिती मिळाली आहे. या प्रशिक्षणातील माहितीचा उपयोग करून आपल्या स्वत:च्या गावचा आपत्कालीन आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी येथे केले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग व आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी श्री. जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, राजश्री सामंत, प्रशिक्षक युवराज नागटिळक, लखन गायकवाड, राहूल पोखरकर आदी उपस्थित होते.
केवळ भूकंप, पूर, अतिवृष्टी यानांच आपत्ती समजायच अस नाही. आपण दैनंदिन जीवनात रस्यावरील अपघात, गावातील विविध घटना, प्रसंग पाहतो तत्कालिन परिस्थितीनुसार या छोट्या-छोट्या घटनाही आपत्ती समजून यामध्ये कोणत्या प्रकारे सहाय्यांची भूमिका बजावू शकतो याची नजर सर्वांना या प्रशिक्षणातून मिळाली आहे. असे सांगून श्री.जोशी म्हणाले की या अनुषंगाने आपण आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी सदैव जागरूक रहायला हवे. याच बरोबर गावचा विचार करून आपत्ती प्रसंगात कोणत्या गोष्टी आपल्या गावात उपलब्ध आहेत याची माहिती वेळोवेळी होणे आवश्यक आहे. कारण या माहितीचा व ज्ञानाचा आपल्याला आपत्ती प्रसंगी निश्चित उपयोग होतो.
जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यावेळी बोलताना म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे आपत्तीवेळी नेमकं काय करायच याच चांगल प्रशिक्षण तुम्हाला मिळाल आहे. भविष्यात याच ज्ञानाचा व माहितीचा तुम्हा सर्वांना चांगला वापर करून आपदग्रस्तांना नेमक सहाय्य करण शक्य होणार आहे. आपत्ती काळात मानवतावादी दृष्टीकान जपून आपदग्रस्तांना मदत करण्याच श्रेय व त्यातील अवर्णनिय समाधान तुम्हाला मिळणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये पोलीस, गृहरक्षकदल, नेहरू युवा केंद्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या युवक-युवतींना प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
प्रवीण सुलेदार, राहूल पोखरकर, लखन गायकवाड, कादर महाजन, शुभम तिवरेकर, सुरेश कांबळे, अक्षय चव्हाण, युवराज नागटिळक या प्रशिक्षकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण या दोन दिवसीय कार्यशाळेत सर्वांना दिले.




























































