हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा विधेयक मांडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेश व दहा विधेयके मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये शक्ती कायदा विधेयक या महत्त्वाच्या विधेयकाचा समावेश आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मुंबईत दोन दिवसांचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. यामध्ये इतर विधेयकांसोबत शक्ती कायदा विधेयक हे महत्त्वाचे विधेयक सभागृहात मांडण्यात येईल. महाराष्ट्र शक्ती फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 (महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973  व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012  यामधील तरतुदींमध्ये सुधारणा करणे, नवीन कलमांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करण्याचा समावेश आहे.

या विधेयकाला मंजुरी मिळून कायद्यात रुपांतर झाल्यावर महिला व बालकांवरील अत्याचार करणाऱयांना जरब बसणार आहे. कारण यामध्ये 21 दिवसांमध्ये खटल्याचा निकाल लागेल.  बलात्कार, अॅसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर गुह्यांमध्ये मृत्युदंडाची तरतूद केली आहे. त्याशिवाय मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक 2020, महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, 2020, मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2020 (कोविड-19 संसर्ग सार्वत्रिक साथ रोगामुळे 2020-21 मध्ये मालमत्ता करातून सूट तसेच सवलत देण्याकरिता कलमात नव्याने पोटकलमाचा समावेश करण्याबाबतच्या विधेयकाचाही यामध्ये समावेश आहे.