आंध्रच्या धर्तीवर राज्यात ‘दिशा’ कायदा करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

876
CM uddhav-thackeray

महिलांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र सरकार कोणतीही तडतोड करणार नाही. महिलांवर अत्याचार करणाऱया गुन्हेगाराला 21 दिवसांत कडक शिक्षा सुनावणारा ‘दिशा’ कायदा महाराष्ट्रात केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला गृह मंत्री एकनाथ शिंदे, अर्थ मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. नितीन राऊत, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.

‘दिशा’ कायदा
महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आंध्र प्रदेशात नेमका काय कायदा केला आहे त्याची माहिती मागवली आहे. त्याची माहिती आल्यावर आंध्र प्रदेशचे सरकार कशा पद्धतीने हा कायदा अमलात आणणार आहे ते पाहिले जाईल. महिलांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र सरकार कोणतीही तडतोड करणार नाही. जे कोणी अत्याचारी असतील त्याची कोणत्याही प्रकारे सुटका होणार नाही. लवकरात लवकर कडक शिक्षा होईल, अशी तरतूद असलेला कायदा महाराष्ट्रात केला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तार योग्य वेळी
या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पत्रकारांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत प्रश्न केला. त्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच योग्य वेळी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विरोधकांचा सभात्याग आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला. मात्र नंतर लगेचच अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, दोन लाखांपर्यंत आमच्या सरकारने 2015 पासून थकीत असणाऱया कर्जाची काळजी घेतली आहे. कर्जमाफी 35 हजार कोटींची जाहीर करणं आणि देणं 17-18 हजार कोटींची असला व्यवहार आमचं सरकार करीत नाही. जे बोलतोय तेवढंच करतोय. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं मी अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत मोकळेपणाने सगळ्यात मोठी कर्जमाफी ही होणार आहे. त्या कर्जमाफीचा आकडा एकत्र केला जाईल तेव्हा भाजप सरकारने दिलेल्या कर्जमाफीपेक्षा किती तरी मोठा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या