सैलानी यात्रेत करमणुकीचे साधने नाही ; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रेमध्ये यावर्षी भाविकांचे गर्दी नियंत्रणासाठी सिनेमागृह, मौत का कुंवा, सर्कस, आकाश पाळणा या मनोरंजन विषयक बाबींवर संपूर्ण बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

सैलानी यात्रेत वाहतूक व्यवस्था संदर्भात दोन बसस्थानक ठेवण्यात यावे तसेच पोलीस यंत्रणेने खाजगी वाहनांचे नियंत्रण करावे, विद्युत विभागाने छोट्या मोठ्या व्यापार्‍यांना विद्युत जोडणी देण्याबरोबरच राज्य विद्युत वितरण कंपनीने मुख्य संदल रस्ता, दर्गा परिसर व होळी ठिकाणी पथदिव्याची व्यवस्था करावी, १५ मार्च ते ३० मार्च दरम्यान भारनियमन करु नये, २४ तास लाईमनच्या ड्युटी लावाव्या, इमरजन्सी म्हणून जनरेटरची व्यवस्था सैलानी बाबा ट्रस्ट कडून करुन घ्यावी व पंचायत समिती बुलढाणा यांनी यात्रेची मांडणी मंजूर ले-आऊटच्या नकाशाप्रमाणे करण्यात यावी. असे आदेशत जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

रुग्णवाहिका, सुस्थितीत व सुसज्ज ठेवाव्या. शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याबाबत कार्यवाही करावी. यात्रेमध्ये स्वच्छता ठेवण्याबाबतही जिल्हाधिकार्‍यांनी सूचना केल्या आहे. अन्न व भेसळ प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहे.

जनावरे व कत्तलखाने यांचे व्यवस्थापन पशुधन विकास अधिकारी यांनी करावे. कत्तलखान्याची जागा यात्रा परिसराचे बाहेर ठेवावी. तसेच उर्दु, हिंदी, मराठी भाषेत परिपत्रके काढून पशुंची कत्तल न करण्याचे आवाहन करावे. सैलानी यात्रा ट्रस्टने यात्रा व्यवस्थापनासाठी अनुदान कमी उपलब्ध असल्यामुळे सैलानी ट्रस्टने ब्लिचींग पावडर, पाणीपुरवठा टँकर, बॅरीगेटस, लाऊडस्पीकर, ड्रोनद्वारे सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करावी. तसेच यात्रेदरम्यान महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य, पोलीस प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, ग्रामीण पाणीपुरवठा, परिवहन महामंडळ, पशु संवर्धन, अन्न व औषध प्रशासन, बांधकाम विभाग इत्यादी विभागाचे तात्पुरते कार्यालये ठेवण्याबाबत देखील जिल्हाधिकार्‍यांनी लेखी आदेश दिले आहे.