पोलीस प्रमुखांच्या ‘बुके नको, बुकं आणा’च्या हाकेला सातारकरांचा प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारताना ‘मला बुके नको, बुकं आणा’, अशी हाक दिल्यानंतर त्या संकल्पनेला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे 400हून अधिक पुस्तके आल्यानंतर ती गडचिरोली येथे रवाना करण्यात आली.

दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांची गडचिरोली येथून साताऱयात जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून बदली झाली. अनोख्या उपक्रमासाठी ते परिचित असून, यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी ‘बुके नको, बुकं आणा’ अशी साद सातारकरांना दिली होती. तोच कित्ता गिरवत समीर शेख यांनीही बुकं आणण्यासाठी हाक दिली. सुरुवातीला भेटायला येणारी मंडळी बुके, हार, पेढे आणतात. ही बाब ओळखून त्यांनी गडचिरोली येथील स्पर्धा परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची गरज असल्याचे नेमकेपणाने ओळखले.

समीर शेख यांनी गडचिरोली येथून सेवा बजावल्यानंतरही तेथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची विविध पुस्तके मिळावीत, हा उद्देश ठेवून पुस्तकांची संकल्पना राबवली. जमा झालेली सुमारे 400 पुस्तके वाहनाद्वारे गडचिरोली येथे रवाना
करण्यात आली.