ठसा : प्रा. व्ही. एस. आसवारे

29

दिवाकर शेजवळ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी समाजपरिवर्तन चळवळीमध्ये गेली ६० वर्षे अखंडपणे कार्य करणाऱ्या प्रा. व्ही. एस. आसवारे सरांचे गेल्या आठवडय़ात अचानक निधन झाले. रविवारी (२४ जून) त्यांना मुंबईत श्रद्धांजली वाहण्यात आली. सरांचा जन्म जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे २० जानेवारी १९४० रोजी झाला. कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची आणि गरिबीची असल्यामुळे त्यांची आई आणि वडील हे उदरनिर्वाहासाठी त्यांचे मूळ गाव पारगाव (शिंगवे) येथून मुंबई शहरात आले. आसवारे सरांच्या आईने काबाडकष्ट करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना शिक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ या संदेशातून प्रेरणा घेऊन सरांनी अत्यंत चिकाटीने व जिद्दीने मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची एम. ए. ही पदवी संपादित केली. पुढे सिद्धार्थ महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय, व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांना लौकिक प्राप्त झाला. प्रबळ इच्छाशक्ती व योग्य प्रयत्न यातून ध्येयसिद्धी होऊ शकते असा आदर्श तरुण पिढीसमोर त्यांनी घालून दिला. गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीतून सरांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यामुळे आंबेडकरी चळवळीकडे ते विद्यार्थीदशेतच आकर्षित झाले. पुढे ते अत्यंत जाणीवपूर्वक या चळवळीमध्ये सक्रिय झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीमुळे समाज जीवनात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ही अवस्था दूर करून डॉ.आंबेडकरांच्या संकल्पनेतील सुसंघटित, सामर्थ्यसंपन्न रिपब्लिकन पक्षाच्या निर्मितीसाठी सरांनी रिपब्लिकन ऐक्य क्रांती दल १९७०च्या सुमारास डॉ. नारायण गायकवाड व इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने स्थापन केला. त्यांनी या क्रांती दलास वैचारिक नेतृत्व देऊन मुंबईतील हजारो तरुणांना संघटित केले. सभा, संमेलने, चर्चासत्रे, मोर्चा इत्यादीमध्ये आसवारे यांचा सतत सहभाग असायचा. त्यांनी उत्तम प्रकारचे समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी अनेक संस्थांची निर्मिती करून आंबेडकरी समाजजीवन विकसित करण्याचा प्रयत्न केला. माझगाव येथील हाजी कासम चाळीतून (खड्डा) त्यांच्या समाजसेवेचा प्रारंभ झाला. त्या ठिकाणी नागसेन सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करून १८० कुटुंबांना अद्ययावत घरे देण्याची योजना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी साकार केली. बेस्ट बौद्ध कामगार संघ व मिठानगर मर्चंट असोसिएशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी समिती आदी संघटनांचेही ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्ष या नात्याने केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. ग्रामीण भागात त्यांच्या मूळ गावी पारगाव (शिंगवे) या ठिकाणी समाजमंदिर निर्मितीसाठी तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास घेतल्या गेलेल्या मागासवर्गीय समाजाच्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई शेडय़ूल कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (आताची पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) या ऐतिहासिक संस्थेमध्ये १९९२ साली सरांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली. ही घटना प्रा. आसवारे यांच्या सामाजिक जीवनातील अतिशय महत्त्वाची आहे. ते या संस्थेचे सचिव झाल्यावर बाबासाहेबांच्या संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने मोठय़ा जिद्दीने प्रयत्न सुरू केले. ट्रस्टचे न्यायालयातील दावे, ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे बँकेचे ट्रस्टवरील कर्ज, महानगरपालिकेला देय असलेला मोठय़ा रकमेचा मालमत्ता कर आणि अंतर्गत व बाह्य अडचणींमधून ट्रस्टला आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने त्यांनी बाहेर काढले. त्यांनी ट्रस्टच्या जागेत यशोधरा संगणक केंद्र, डॉ. आंबेडकर बुक सेंटर, मोफत कायदा सल्ला केंद्र, जीवक वैद्यकीय सल्ला केंद्र, सम्यक व्यवसाय मार्गदर्शन केंद्र इत्यादी समाजोपयोगी आणि सांस्कृतिक उपक्रम सुरू केले. अनेकांना त्याबाबत सहकार्य व मदत केली. ट्रस्टला आर्थिक स्वयंपूर्णता व जनाधार मिळवून दिला. त्यामुळे ट्रस्टमध्ये नवचैतन्य आले, ट्रस्टला समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले. या कार्यात आसवारे सरांचा सिहांचा वाटा होता यात तिळमात्र शंका नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या निर्मितीचा आसवारे यांचा संकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. प्रा. व्ही. एस. आसवारे सरांच्या कार्याचा मागोवा घेताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन होते. ते उत्तम संघटक, प्रभावी वत्ते, विचारवंत, निष्ठावंत, जागरूक कार्यकर्ते आणि लोकसंग्रहक होते. सामाजिक जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जाताना त्यांच्यात असलेला दुर्दम्य आशावाद, जिद्द आणि चिकाटी जाणवत असे. आंबेडकरी विचारावरील त्यांची अविचलित श्रद्धा, ऐक्याची भावना यामुळे आंबेडकरी समाजात एक मानाचे व आदराचे त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या अचानक जाण्याने आंबेडकरी चळवळीचा एक बिनीचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या