
खतरनाक
गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अन्याय व त्याला अनुसरून समाज, समाजाची बदलती मानसिकता, पोलिसांची कारवाई असे अनेक विषय मांडणारा कथाभाग हे यंदाच्या खतरनाक दिवाळी अंकाचे वैशिष्टय़. या दिवाळी अंकाची संकल्पना कायम गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि समाज अशी वेगळी असते. त्यामुळे यात रुची असलेल्या वाचकांना हा अंक नक्की आवडेल. मात्र तरीही वेगळा प्रयोग म्हणून यंदा ‘दशावतार’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्याशी केलेली बातचित वाचकांना नक्कीच आवडेल.
संपादिका : सोनल खानोलकर,
पृष्ठे : 144, मूल्य : 200 रुपये
उल्हास प्रभात
‘उल्हास प्रभात’चा या वर्षीचा 31 वा दिवाळी विशेषांक प्रकाशित झाला असून आई एकवीराचे मुखपृष्ठ आणि माहितीचा समावेश असून डॉ. सोपान बुडबाडकर यांचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य, ‘चौथ्या दशकामध्ये प्रवेश’ हे विशेष संपादकीय – डॉ. गुरुनाथ पांडुरंग बनोटे, ‘एका लेकीची संघर्षगाथा’ चंद्रकांत पाटील, विनोदी कथा – नवनाथ तांडेल, व्यथा मनाची सांगु कुणा… – शीतल दिवेकर, आजची कळी उद्याची हुंडाबळी – गणपत दोंदे. विशेष म्हणजे वाचकांसाठी वाचक खजिना, कथा,कविता, लेख यासोबत हसा, मेनू, टिप्स, ऍक्युप्रेशर, प्राणिक हिंलिंग, डाऊझिंग, मुद्रा आणि आरोग्य अशा बऱ्याच काही वाचनीय साहित्याचा यामध्ये समावेश आहे.
संपादक : डॉ. गुरुनाथ पांडुरंग बनोटे,
पृष्ठे : 148, मूल्य : 120 रुपये
धमाल धमाका
‘धमाल धमाका’ हा विनोदी दिवाळी अंक गमतीदार विनोदासाठी गंभीरपणे प्रयोग करणारे विनोदी दिवाळी वार्षिक विशेषांक आहे. लैंगिकतेकडे झुकलेल्या ओंगळ आणि अभिरुचीशून्य विनोदाच्या गर्दीत अभिरुचीसंपन्न आणि सहाबहार विनोदाने संपन्न असा हा दिवाळी अंक असणार आहे. या अंकात विजय कापडी (कोंबडय़ा उडाल्या भूर्रर्रर्र…), अपर्णा देशपांडे (कॉफी आणि आफत), प्रेमा खांदवे (मुलं देवाघरची फुलं), राजेश नाईक (सरप्राईज), सुनील होरने (एक प्रवास लाल परीसोबत), भारती सावंत (मी स्वयंपाक करतो) यांसारख्या एकूण 24 लेखांच्या लेखनाने सजलेला हा दिवाळी अंक आहे. याचसोबत ज्ञानेश बेलेकर, दत्तात्रय म्हेतर, प्रभाकर झळके यांसारख्या प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे या दिवाळी अंकाची शोभा वाढवतात. साचेबंद व कंटाळवाण्या विनोदाला छेद देणाऱ्या खळखळत्या विनोदी कथांचा आनंद वाचकांना या दिवाळी अंकातून घेता येईल. तसेच प्रा. रमणलाल शाह लिखित नवीन वर्षाचे वार्षिक राशीभविष्यदेखील वाचायला मिळेल.
संपादक : नसीर बी. शेख, पृष्ठे : 200, मूल्य : 250 रुपये
 
             
		



































 
     
    


















