संत साहित्यातील दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामदेव सदावर्ते

योगीजनाचे जेव्हा परब्रह्माशी ऐक्य होते त्यावेळी द्वैतभाव नष्ट होतो व अद्वैत, एकस्वरूपता स्थिती निर्माण होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्या योगीयास महासुखाची दिवाळी दिसते. ज्ञानराज म्हणतात –

तैसे होय तिये मेळी । मग सामरस्याचिया राऊळी ।।

महासुखाचि दिवाळी । जगेसि दिसे ।।

दिवाळीचे हे पाच दिवस जसे आनंदाचे, प्रेमाचे, उत्सवाचे असतात. तसाच आनंद सज्जनांना संतजन भेटतात तेव्हा होतो. हरिभक्तांची ज्या दिवशी भेट घडेल तो दसरा-दिवाळीसारखा सणाचा दिवस उगवला असे संत मानतात. संत एकनाथ म्हणतात-

माझे भक्त भाग्ये येती घरा । ते पर्वकाळ दिवाळी दसरा ।।

तेथे तीर्थे धावती माहेरा । जेवी सासुराहूनि कुमारी ।।

संत येतील तेथे सकळ तीर्थे धावत येतात. भक्तांना भगवत्सुखाची प्राप्ती संत घरी येण्याने होते. म्हणून संत म्हणतात-

साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।

संतांचे येणे आनंदाचे असण्याचे कारण संत घरी येताच ज्ञानदीप लावतात. त्यांची यात्रा प्रबोधन यात्रा असते. अज्ञानी लावावे सन्मार्गासी म्हणून संत येताच आनंदी दिवाळी होते.

संत नामदेव म्हणतात-

नित्य नवा दिवाळी सुखाचा सोहळा ।

भोगिन अवलिळा संतसंगे ।।

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी ।

विष्णूदास नामा जीवे भावे ओवाळी ।।

संतांना डोळय़ांनी पाहिले असता त्यांच्या दर्शनामुळे मला अत्यानंद होतो. माझे हृदय भरून येते. दृष्टी सुखावते. मनात प्रकाश पसरतो. माझे मायबाप भेटल्याचा मला आनंद होतो. संसार दुःखाने शिणलेल्या माझ्या जीवनात ज्ञानानंद निर्माण होऊन मला सुखाची व आनंदाची प्राप्ती होते. संत सेना म्हणतात-

आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे आले घरा ।।

ते श्रीहरीचे लाडके भक्त, संतसज्जन मला ज्या दिवशी भेटतात तो दिवस मला दिवाळी दसरा या आनंददायी सणासारखा वाटतो. त्यांच्या दर्शनाने मला अपूर्व आनंद होतो. त्यामुळे जे सुख मिळते त्या सुखासारखे सुख त्रिभवनात मिळणार नाही. संतजन भेटताच भगवंताच्या नामाचा मोठा जयजयकार होतो व सर्वत्र आनंदाचा प्रकाश पसरतो. अशा संतांच्या पायी जीव अर्पण करावा. तुकोबा म्हणतात-

दसरा दिवाळी तोचि माझे सण । संत हरिजन भेटतील ।।

ईश्वर नामस्मरणाने, नामजपाने व नामचिंतनाने आम्ही कळिकाळासही न घाबरता त्यास सोटे मारू. वैकुंठाचा देव कीर्तनात येऊन आनंदाने नाचतो. तो सुखसोहळा आम्ही दिवाळीसारखा साजरा करतो. संत सावतामाळी म्हणतात-

सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमे वनमाळी चित्ती धरू ।।

सावता म्हणे ऐसा भक्तीमार्ग धरा। तेणे भक्तिद्वारा ओळंगती।।

पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची आवड आणि त्याच्या भेटीसाठी आसावलेले मन हीच आमची धन-संपत्ती आहे. पंढरीहून येणाऱया प्रत्येक माणसाला मी हेच विचारतो. मला तो भेटीसाठी का बोलावीत नाही. माझा त्याला काय विसर पडला आहे. तो तर कृपासागर आहे आणि माझी त्यावर एकनिष्ठ भक्ती आहे. संत नामदेव म्हणतात-

माहेरिची आस दसरा दिवाळी । बाहे निढळी ठेऊनी वाट पाहे।।

सखे वारकरी पंढरीस जाती । निरोप त्या हाती पाठवीन ।।

निर्बुजला नामा कंठी धरिला प्राण । करितसे ध्यान रात्रंदिवस।।

आई जशी आपल्या लेकीची कमरेवर हात ठेवून वाट पाहत असते. तसे मी माझ्या आईची आणि माहेराची कंठी प्राण धरून वाट पाहत आहे.

भेटीलागी माझा फुटतसे प्राण । काया वाचा मने जीवभावे ।।

जया देखे तया पुसे हेचि मात । कै मज अनंत बोलवील ।।

संतसमागमे दसरा दिवाळी । ठेऊनि निढळी बाहे सदा ।।

सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरी त्यांचे पायी ।।

नामा म्हणे ऐसे करी दंडवत । आमुते पुनित करी देवा ।।

पंढरीत विठ्ठलाच्या पुजाऱयांनी चोखामेळा या विठ्ठलभक्तांस खूप मारहाण केली, खूप छळ केला. ते पाहून प्रत्यक्ष पांडुरंगालाही दुःख झाले. मग भक्तवत्सल पांडुरंगाने नवल घडविले. भक्तांचा सगळा समुदाय चोखामेळय़ाच्या घरी पाठविला. त्यात रिद्धिसिद्धी होत्या. चोखामेळय़ाचे संपूर्ण घर व परिसर स्वच्छ करून सुशोभित केला. तोरणे, माळा, फुले, पाने, पताका, गुढी उभारून सर्वत्र आनंदमय सुगंधी वातावरण बनविले. नामदेवाचे भक्तीप्रेममय कीर्तन झाले. असंख्य ब्राह्मणांच्या पंगती बसल्या. त्यांचे यथेच्छ मिष्टान्न भोजने झाली. स्वर्गीचे देव पुष्पवृष्टी करू लागले. संत चोखामेळा म्हणतात-

रंग माळा सडे गुढीया तोरणे । आनंद कीर्तन वैष्णवांचे ।।

असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती । विमानी पाहती सुरवर ।।

तो सुख सोहळा दिवाळी दसरा । ओवाळी सोयरा चोखीयासी।।

संत ज्ञानदेवांनी तर आपल्या सर्व ग्रंथातून दिव्यांची रोषणाई केली आहे. आनंदाची तृप्ती देणारी दिवाळी साजरी केली आहे. ज्ञानेश्वरीत संत कृपेचे दीप प्रकाशमान केले आहेत. त्यांनी चैतन्यदीप उजळीले आहेत. ज्ञानाचे दीप सतत तेवत ठेवले आहेत. संतांनी सतत प्रकाशाचीच पूजा केली आहे. साधकांना दिवाळी सणाची आठवण देणाऱया हजारो ओव्या ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरीत अनेक प्रकारचे दीप आहेत. निर्वातीचा स्थिरदीप आहे. विवेकदीप, निवृत्तीकृपादीप, सुविद्यपढतदीप आहे. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा ज्ञानदीप हा सज्जनाचे रक्षण करणारा असतो. श्रीकृष्ण हा तर यादवकुळाचा कुलदीपक आहे. तो अविवेकाची काजळी दूर करून विवेकदीप उजळतो. तो योगीजनांना दिवाळीचा आनंद देतो. ज्ञानराज म्हणतात-

मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळी ।

तै योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।।

सूर्यदेवाने पूर्व दिशेचे अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझा अंगीकार केल्याने माझी वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करील. ज्ञानराज म्हणतात-

सूर्ये अधिष्ठली प्राची । जगा राणीव ते प्रकाशाची ।

तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ।।

योगीजनाचे जेव्हा परब्रह्माशी ऐक्य होते त्यावेळी द्वैतभाव नष्ट होतो व अद्वैत, एकस्वरूपता स्थिती निर्माण होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्या योगीयास महासुखाची दिवाळी दिसते. ज्ञानराज म्हणतात –

तैसे होय तिये मेळी । मग सामरस्याचिया राऊळी ।

महासुखाचि दिवाळी । जगेसि दिसे ।।

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व असते. सायंकाळी विशेष मुहूर्तावर ही पूजा करतात. विष्णूपत्नी लक्ष्मी प्रसन्न व्हावी. सुखसमृद्धी, धनसंपत्ती व आरोग्यप्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा श्रद्धापूर्वक केली जाते.

दैवदैत्यांनी सागराचे मंथन केले त्यावेळी लक्ष्मी सागरातून वर आली. ही समुद्रमंथनातून उत्पन्न झाल्यावर देवांचे तेज सामर्थ्य वाढले. लक्ष्मीचे तेज, सौंदर्य, रूप-लावण्य पाहून देव, आसुर, यक्ष, किन्नर सारे लोक ही रूपवती लक्ष्मी आपल्यालाच मिळावी अशी सर्वांनाच इच्छा झाली, पण लक्ष्मीने सर्वांना डावलून भगवान विष्णूंच्या गळ्यात वरमाला घातली व लक्ष्मी विष्णूपत्नी झाली. अशी ही लक्ष्मी जेथे भगवान असतात तेथेच राहते. ज्ञानराज म्हणतात-

तैसे सकळ पुरुषार्थ । जेणे स्वामी का सनाथ ।

तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ।।

संत नामदेव पंढरीचे महात्म्य सांगताना म्हणतात-

नित्य हे दिवाळी असे पंढरपुरीं । ओवाळिती नारी विठ्ठलासी।।

पंढरीसी करू नित्य दिवाळी । आरती ओवाळी केशवासी ।।

नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा।भोगिजे अवलिळा संतसंगे।।

संत नामदेवांना पंढरीचा पांडुरंग आनंदाचा सागर आहे. तो दिसला की त्यांना दिवाळीसारखा आनंद होतो. ते म्हणतात-

कोटी दिवाळय़ा दसरे । आम्हा हेचि जाले पुरे ।।

घरोघरी ओवाळणी । विठ्ठल देखिला नयनी ।।