
दिवाळी म्हटली की गोडधोड खाद्यपदार्थ आणि फराळासोबतच दिवाळी अंकांचाही साहित्यिक फराळ असतोच. वाचकांची अभिरुची समृद्ध करणारे दैनिक ‘सामना’ आणि ‘मार्मिक’ हे दिवाळी अंक वाचकांचे खास आकर्षण असतात. आज ही प्रतीक्षा संपली. गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि दैनिक ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ निवासस्थानी या दोन्ही दिवाळी अंकांचे शानदार प्रकाशन झाले. दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत या वेळी उपस्थित होते.
कला, संस्कृती आणि वैचारिक साहित्याने परिपूर्ण ठरलेल्या ‘सामना’ व ‘मार्मिक’ या दोन्ही अंकांनी वाचकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे. याच परंपरेतून यंदाचे हे दिवाळी अंकही मनोरंजनासह भरपूर वैचारिक खाद्य देणारे ठरणार आहेत.
दिवाळी अंकांच्या प्रकाशनाच्या वेळी ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, प्रबोधन प्रकाशन प्रा.लि.चे संचालक विवेक कदम, दैनिक सामना पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अरुण निगवेकर, संभाजीनगर आवृत्तीचे निवासी संपादक गणेश तुळशी, मुख्य वितरक चारुदत्त बाजीराव दांगट, नॅशनल हेड (मार्केट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, जाहिरात व्यवस्थापक सुचित ठाकूर, विनायक परब, व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव, शिवसेना सचिव – आमदार मिलिंद नार्वेकर, वितरण व्यवस्थापक विजय चारी आणि रवींद्र म्हात्रे आदी उपस्थित होते.
व्होटचोरी, जेन-झी, राजकारण आणि शहरांचे दशावतार
देशात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय असलेली ‘व्होटचोरी’ ही ‘सामना’च्या दिवाळी अंकात मुख्य मुखपृष्ठ कथा आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचा ‘व्होटचोरीविरुद्ध पुकारलेले युद्ध’ हा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची पोलखोल करणारा लेख या अंकात आहे. याशिवाय देशातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले फायर ब्रॅण्ड नेते कन्हैया कुमार व लेखिका मुग्धा धनंजय यांनी भारतातील ‘जेन-झी’ अर्थात तरुणाई काय करतेय, यावर जोरदार मंथन केले आहे. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात सध्या पातळी सोडून सुरू असलेली चिखलफेक आणि वाढीस लागलेला राजकीय विद्वेष याचा वेध घेतानाच ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी ‘राजकारणातील मांगल्य संपले’ या लेखातून चार-पाच पिढय़ांतील सुसंस्कृत राजकारणावर भाष्य केले आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर प्रकाशझोत टाकणारे निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे व आरटीआय कट्टाचे विजय पुंभार यांचे परखड लेख या दिवाळी अंकात आहेत. शहरांचे दशावतार या लेखमालेत भक्ती चपळगावकर, संजय यादवराव, विनिता देशमुख आणि प्रा. दिलीप फडके यांनी शहरांतील स्थित्यंतराचा आढावा घेतला आहे. याशिवाय प्रसाद कुलकर्णी, नागेश शेवाळकर व सचिन बेंडभर यांच्या विनोदी कथा आणि सोंगांच्या भजनाचे विश्व उलगडणारा डॉ. सुशील कुमार सरनाईक यांचा माहितीप्रचूर लेख व सोशल मीडियावरील खाद्य संस्कृतीचा ऊहापोह करणारा चिन्मय दामले यांचा लेखही या दिवाळी अंकात आहे.
कथा, लेख, विडंबन कविता आणि व्यंगचित्रांची बहार
‘मार्मिक’च्या यंदाच्या दिवाळी अंकात विनोदी कथा, विनोदी लेख, तिखट तिरकस विडंबन कविता आणि व्यंगचित्रांची बहार अनुभवायला मिळेल. दिवाळी आली की ज्येष्ठ कवी आणि लेखक अशोक नायगावकर यांच्यातील अनंत अपराधी जागा होतो आणि प्रिय मित्र ‘तातूस पत्र’ लिहून हालहवाल विचारतो, आपले हालहवाल कळवतो. गजू तायडे यांच्या चपखल विडंबन कवितांचे तिरकस ‘उडते तीर’ भल्याभल्यांच्या टोप्या उडवतात आणि त्यांना विद्ध करून जातात. नव्या फळीतील आघाडीचे विनोदी लेखक सॅबी परेरा यांचा कलंक नावाचा बोका यंदा एका महान नेत्याबरोबर राजनैतिक परदेश दौऱ्यावर कसा जायला निघाला आणि त्याने तिथे काय पराक्रम गाजवला याची हकीकत अंकात कथास्वरूपात वाचायलाच हवी. ज्येष्ठ लेखक संजय भास्कर जोशी यांच्या फँटसीकथेत पडद्यावरचा राज कपूर नाचत नाचत पडद्याबाहेर येतो आणि नायकाला पडद्यात घेऊन जातो, मग काय होतं ते वाचायलाच हवं. सम्राट अकबरांची स्वारी मॉलमध्ये खरेदी करायला निघाली तर काय धमाल उडेल, याची गंमत-ए-जंमत सारिका कुलकर्णी यांच्या कथेत वाचायला मिळते. श्रीकांत आंब्रे यांच्या वात्रटिका आणि धनंजय एकबोटे यांच्या व्यंगचित्रांनी सजलेल्या चारोळय़ा बारोळय़ा, उदय कुलकर्णी यांनी सांगितलेली सिनेमाच्या कथेची फिल्मी चित्तरकथा, प्रसाद कुळकर्णी यांची खुसखुशीत खाद्यभ्रमंती, सुनील सरनाईक यांनी जिवंत केलेला गोंधळय़ांचा गोंधळ, विलास कुमार यांनी रसाळ पद्धतीने सांगितलेलं भांडी पुराण, चंद्रसेन टिळेकर यांना भेटलेला धादांत खोटं भविष्य सांगणारा ज्योतिषी आणि जनगणना करायला निघालेल्या मास्तरांना अवचित भेटणारी ‘ती’ कोण असा रोमँटिक पेच पाडणारी ऋषिराज शेलार यांची कथा, ही अंकाची आणखी काही आकर्षणे आहेत. नाटककार आणि स्तंभलेखक संतोष पवार यांनी ‘महान राष्ट्राचा वग’ लिहून महान राष्ट्राच्या तीन तिघाडा काम बिगाडा सरकारचा परखड पंचनामा केला आहे.