
रेल्वेच्या भूखंडावरील 2011 पूर्वीच्या झोपडय़ांना निष्कासित न करता महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्विकास धोरणानुसार त्यांना कायदेशीर संरक्षण देऊन पक्की घरे द्या, अशी आग्रही मागणी शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत यांनी केली. मध्य रेल्वेच्या झोनल कमिटीच्या आज पार पडलेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे.
खासदार अरविंद सावंत म्हणाले, अलीकडेच मध्य रेल्वेने त्यांच्या भूखंडावरील परळ वर्कशॉपजवळील झोपडय़ांना खाली करण्याच्या नोटीस बजावली आहे. ही कारवाई तातडीने थांबवावी. देशाचे पंतप्रधान गरिबांना पक्की घरे देण्याचे वचन देत असताना त्यांना निष्कासित करणे योग्य नाही. पंतप्रधान आवास योजनेतही अशा झोपडय़ांना संरक्षण दिले आहे.यावेळी त्यांनी शिवडी आणि प्रभादेवी स्टेशनवर पूर्व पश्चिम जोडणारा पादचारी पूल, डॉकयार्ड, रे रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवरील पादचारी पुलांची कामे आजही सुरु झाली नसल्याने असमाधान व्यक्त केले. महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही आणि कसारा कर्जत जाणाऱया लोकलमध्ये टॉयलेटची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयाच्या दर्शनी भागात विना विलंब बसवण्याची मागणी केली.



























































