
आपल्याकडे सणवार आल्यावर, काही खास पदार्थ करण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आलेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आहाराचे स्वतःचे असे महत्त्व आहे. ऋतू बदलु लागतो तसे आपल्या आहारातही बदल होत असतात. श्रावणात आपल्या खाण्यामध्ये पारंपरिक पदार्थ हे खूप असतात. यामध्ये गव्हाची खीर, उकडीचे कानवले, पुरणाचे दिंड, तांदळाची खीर आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पातोळ्या.
Shravan Special – उपवासाला राजगिरा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. पावसाळ्यात म्हणूनच हळदीच्या पानांचा आहारामध्ये उपयोग करता येतो. हळदीची पाने पचनास मदत करतात आणि पोट फुगणे या अशा इतर पोटाच्या समस्या कमी करतात. तसेच हळदीच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने, शरीरावरील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते. हळदीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने, ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.
श्रावणामध्ये बहुतांशी घरांमध्ये पातोळ्या या बनतातच. बाजारात हळदीची पाने दिसू लागल्यानंतर, घरामध्ये विविध पदार्थ बनवले जातात. हळदीच्या पानात पदार्थ शिजवण्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत. हळदीच्या पानातील पातोळ्या हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. हळदीचे पान सुगंधी आणि औषधी गुणधर्मांमुळे खास आहे.
पातोळ्या
साहित्य-
सारण तयार करण्यासाठी-
2 वाट्या-किसलेलं ओलं खोबरं
2 वाट्या- किसलेला गूळ
1 टीस्पून- वेलची पूड
1/2 टीस्पून- जायफळ पूड
3 टेबलस्पून- तूप
बाहेरील आवरण तयार करण्यासाठी
1.5 वाटी- तांदळाचं पीठ
चिमूटभर मीठ
एक टेबलस्पून- तूप
पाणी
8 हळदीची पाने
कृती-
सारण तयार करण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तूप गरम करावे. त्यानंतर त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं अगदी मंद आचेवर परतवून घ्यावे. खोबरे हलकेसे गुलाबी झाल्यानंतर त्यात किसलेला गूळ घालून घ्यावा. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत हे सारण सतत ढवळत राहावे. सारणाला रंग येईपर्यंत परतवावे. सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून व्यवस्थित मिक्स करावे.
हे सारण व्यवस्थित थंड होऊ द्यावे. त्यानंतर उकड तयार करण्याची तयारी करावी. याकरता एका टोपामध्ये 1.5 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये एक टेबलस्पून तूप आणि चिमूटभर मीठ घालावे.
गॅसची फ्लेम बारीक करूनच त्यामध्ये तांदळाचं पीठ घालावं. हे पीठ सतत ढवळत राहावं. पीठ आणि पाणी व्यवस्थित एकजीव व्हायला हवं. पीठ घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करावा. टोपावर झाकण लावून तसेच हे पीठ ठेवावे.
त्यानंतर तयार झालेली ही उकड एका परातीत काढून व्यवस्थित मळून घ्यावी. उकड मऊ आणि लुसलुशीत होईल याची काळजी घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी शिंपडा.
पातोळ्या करण्याआधी हळदीची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावी. उकडीचे छोटे गोळे बनवुन, हाताने किंवा लाटण्याने थापून गोल पुरीसारखा आकार द्यावा. हळदीच्या पानावर ही थापलेली उकड ठेवावी. त्यानंतर अर्धा चमचा सारण व्यवस्थित पसरववावे. हळदीच्या पानाला मध्यभागी दुमडून घेऊन, कडा हलक्या हाताने बंद कराव्यात. तयार झालेल्या पातोळ्या उकडण्यासाठी मोदक पात्रात किंवा कुकरमध्ये पाणी गरम करुन ठेवाव्यात.