
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे थंडी ही वाजणारच. पण तरीही जर तुम्हांला इतरांच्या तुलनेत जास्त थंडी वाजत असेल तर ही बातमी तुमच्या नक्कीच कामाची आहे. कारण जास्त थंडी वाजणे ही सामान्य गोष्ट नसून तुमचं शरीर कुरबुर करत असल्याचे ते लक्षण आहे. असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
हिवाळ्यात, पावसाळ्यात किंवा एसी रुममध्ये बसल्यावर थंडी वाजते. फार तर थंड पाण्यात काम केल्यानंतर किंवा ताप आल्यावरही हु़डहुडी भरते. पण जर हलक्या थंडीतही तुम्ही गारठून जात असाल, तुमची हाडं ठणकत असतील तर तुमच्या शरीराला आरामाची गरज असल्याचे ते संकेत आहेत. कारण गरजेनुसार पुरेसा आराम मिळत नसल्यास शरीराचे तापमान बिघडते. त्यामुळे झोप लागत नाही. परिणामी पचनक्षमता मंदावते. त्यामुळे शरीरात उर्जा निर्मितीचा वेग कमी होतो. जेणेकरून संबंधित व्यक्तीला थंडी वाजू लागते.
तसेच जर शरीरात रक्तभिसरण योग्य होत नसेल तेव्हाही तुम्हाला थंडी वाजू शकते. प्रामुख्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित तक्रारी असलेल्या रुग्णांना कायम थंडी वाजत असल्याची तक्रार असते. त्याचबरोबर स्नायू ताठर होणे, सांधेदुखी आणि पोटात गोळा येण्याची तक्रार असल्यासही थंडी वाजते. शरीरात रक्ताभिसरण योग्य पद्धतीने न होणे हेच यामागचे कारण असते. रक्तातील दाटपणा आणि अपुरा आहार ही यामागची प्रमुख कारणं असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
तसेच शरीरात रक्ताची कमतरता असेल वजन कमी असेल किंवा हार्मोन्समध्ये असंतुलन असल्यासही थंडी वाजते. त्यातही ही लक्षणे प्रामुख्याने मुलींमध्ये दिसून येतात.






















































