
सामना ऑनलाईन । भोपाळ
तापाची तपासणी करायला आलेल्या तरुणाला तपासणीत गर्भवती दाखवल्याने मध्य प्रदेशमधील भिंड येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघड होताच पॅथोलॉजी विभागाचा डॉक्टर त्याचं क्लिनिक बंद करून परागंदा झाला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सुरेश नावाच्या तरुणाला सतत ताप येत होता. त्यामुळे त्याला टायफॉईड किंवा तत्सम ताप असावा असा संशयाने त्याला डॉ. वर्मा यांच्या श्याम पॅथोलॉजी सेंटरमध्ये रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आलं. तपासणी झाल्यानंतर आलेल्या अहवालाने सुरेशला भोवळ यायची बाकी राहिली. कारण, त्यात त्याच्या तापाच्या निदानाऐवजी तो गर्भवती असल्याचं निदान छापलं होतं. त्याने त्याच्या डॉक्टरला तो अहवाल दाखवला. डॉक्टरने त्याला दुसऱ्या पॅथोलॉजी लॅबकडे जाण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, चुकीच्या अहवालाची बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे सुरेशच्या अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्या डॉ. वर्मा नावाचा डॉक्टर आपलं क्लिनिक बंद करून फरार झाला आहे. या प्रकरणाची तक्रार राज्याच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली असून विभागाने परिसरात छापे टाकून अवैधरित्या सुरू असलेल्या पॅथोलॉजी सेंटर्सना टाळं ठोकलं आहे.
























































