गाझीयाबादमधील एका विवाहित महिलेच्या हत्येचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करत एका डॉक्टरला अटक केली आहे. विवाहित महिला आणि डॉक्टर यांचे प्रेमसंबंध होते. डॉक्टरही विवाहित असल्याने त्याला महिलेपासून सुटका करून घ्यायची होती. अनेकदा सांगूनही महिला पाठ सोडत नसल्याने डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलत महिलेला विषारी इंजेक्शन देत तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गाझीयाबदच्या मसूरी भागातून एक 31 वर्षांची महिला 7 सप्टेंबरला संशयास्पद स्थितीत बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शबाना असे तिचे नाव असून तिच्या नवऱ्याने ती घरातून दागिने आणि सुमारे दोन लाखांची रोकड घेऊन बेपत्ता झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली. मात्र, महिलेबाबत काहीच माहिती मिळाली नाही. त्याच भागात राहणाऱ्या डॉक्टर इस्माईलच्या संपर्कात महिला होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी डॉक्टरची माहिती काढण्यास सुरुवात केली. डॉक्टरने काही दिवसांपूर्वीच मोबाईल क्रमांक बदलल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याच्या जुन्या मोबाईल नंबर शोधत त्यावरुन केलेले कॉल, संपर्क आणि लोकेशनची माहिती मिळवली. लोकेशनच्या आधारे चौकशीसाठी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले.
डॉक्टरने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, मोबाईल क्रमांक का बदलला असे विचारल्यावर त्याला उत्तर देता आले नाही. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली देत महिलेची हत्या केल्याचे सांगितले. आपण महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिचे आणि आपले प्रमसंबंध होते. आम्ही दोघेही विवाहित असल्याने हे प्रकरण अधिक वाढवू नये, असे आपण तिला सांगितले होते. मात्र, ती आपली पाठ सोडत नव्हती. आपल्याला तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती. त्यामुळे आपण तिच्या हत्येची योजना आखली. तिला फिरवण्याच्या बाहाण्याने आपण नोयडाला नेले. त्यानंतर चंदीगढला नेले. तेथे तिला विषारी इंजेक्शन दिले. तिचा मृत्यू झाल्यावर तिच्या मृतदेहाची कुरुक्षेत्रजवळ विल्हेवाट लावली, अशी माहिती डॉक्टरने दिली. आपला कोणालाही संशय येऊ नये आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आपण मोबाईल क्रमांक बदलल्याचे डॉक्टरने सांगितले. मात्र, पोलिसांनी बदललेल्या मोबाईल नंबरच्या आधारे हत्येचा उलगडा केला आहे.

























































