परीक्षण – विधिमंडळातील भाषणांचा दस्तावेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राजेश पोवळे

महाराष्ट्राच्या वैभवशाली, सुसंस्कारित आणि सामंजस्यपूर्ण राजकीय परंपरेचे दाखले आजही देशभरात दिले जातात. सध्याची राजकीय परिस्थिती कितीही दूषित आणि गढूळ झालेली असली, तरी एके काळी महाराष्ट्राच्या राजकीय पटलाने आणि विधिमंडळाने एकमेकांची मर्यादा राखत, वैयक्तिक पातळीवर नाही तर केवळ वैचारिक पातळीवर टीका करणारे सूज्ञ राजकारणी तसेच विरोधकांना घाम पह्डणारे उत्तम वत्तेही पाहिलेत..

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेत आमदारांकडून उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द नोंदवला जातो. याच विधिमंडळाच्या बाकांनी आणि भिंतींनी काही नेत्यांची भाषणं जिवाचे कान करून ऐकली आहेत, त्यातलंच एक नाव अर्थात रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे.

आमदारकीच्या काळात सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणांनी विधिमंडळात कायमच वेगळा ठसा उमटवला. सुनील तटकरे यांच्या आमदारकीच्या काळात, विधिमंडळात केलेल्या निवडक भाषणांचं पुस्तक नुकतंच वाचकांच्या हाती सुपूर्द करण्यात आलं. अभिनंदन… अभिवादन हे पुस्तक म्हणजे जुन्या जाणत्या लोकांसाठी आठवणींचा पेटारा आहे आणि तरुण पिढीसाठी संदर्भग्रंथ आहे. या पुस्तकात शरद पवार, इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील, बॅ. ए. आर. अंतुले, आर. आर. पाटील अशा अनेक मान्यवरांविषयी सुनील तटकरे यांनी केलेल्या भाषणांचा समावेश आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रस्तावना दिलेली आहे.

या पुस्तकातलं पहिलंच भाषण आहे ते शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावाचं. या भाषणातल्या प्रत्येक शब्दात सुनील तटकरेंच्या मनात शरद पवारांबद्दल किती आदर आहे याची प्रचीती येते. महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवार या नावाशिवाय का पूर्ण होऊ शकत नाही, याची जाणीव हे भाषण वाचताना होते. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा सर्वंकष आढावा या भाषणात घेण्यात आलाय. विविध मंत्रीपदं भूषवताना पवारांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम, विविध विचारसरणीच्या नेत्यांशी आणि विविध क्षेत्रांतल्या नामवंत लोकांशी स्नेहपूर्ण संबंध जपण्याचं शरद पवारांचं कसब, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध आणि नव्या फळीतल्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर असलेली माया याचं यथार्थ वर्णन या भाषणात करण्यात आलंय. भारताची आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावात इंदिरा गांधी आणि त्यांच्याभोवती फिरणारा राजकीय पट मांडताना स्वातंत्र्यप्राप्तीपासून 1980 च्या दशकापर्यंतच्या विविध राजकीय घडामोडींचा सुनील तटकरे यांनी आढावा घेतला आहे.

वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावात सुनील तटकरे यांची समकालीन राजकारणाकडे पाहण्याचा अभ्यासू दृष्टिकोन दिसतो. वसंतदादा पाटील यांनी बालवयापासूनच केलेला संघर्ष, स्वातंत्र्यलढय़ासाठी त्यांनी दिलेलं योगदान, विचारांची पक्की बैठक, यावर तटकरेंनी भाष्य केलं आहे. काँग्रेसचा विचार राज्यातल्या जनतेत रुजवण्यासाठी वसंतदादांनी घेतलेले कष्ट, कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ, व्यक्तिमत्त्व आणि राहणीमानातला साधेपणा, शेती आणि सहकार क्षेत्रावर असलेली वसंतदादांची हुकूमत, आणीबाणीनंतर काँग्रेसला पुन्हा ताकद मिळवून देण्यासाठी वसंतदादांनी उपसलेले कष्ट यावरही सुनील तटकरेंनी दृष्टिक्षेप टाकला आहे. बॅ. अंतुले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना सुनील तटकरे यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह भावुक झालं होतं. एका छोटय़ाशा गावात जन्माला येऊन, त्यांचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासाचा सांगोपांग आढावा या भाषणात सुनील तटकरेंनी घेतला आहे. आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर शोक प्रस्ताव मांडताना तटकरेंनी आपल्या ओघवत्या शैलीने उपस्थितांच्या मनाला हात घातला. वडिलांकडून मिळालेलं समाजकारणाचं बाळकडू, आईचे उत्तम संस्कार या जोरावर आबांनी राजकारणात जे वलय निर्माण केलं, त्याचा आढावा तटकरेंनी या भाषणात घेतलाय.

25 वर्षांच्या कारकीर्दीनंतर विधिमंडळाचा निरोप घेताना सुनील तटकरे यांनी जे भाषण केलं ते सर्वस्पर्शी आणि अभ्यासपूर्ण असंच म्हणावं लागेल. आपल्या सहकाऱयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतानाच त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे देखील आभार मानले आहेत. कार्यकर्ता ते नेता, नेता ते आमदार, आमदार ते मंत्री या विविध टप्प्यांवर आलेले अनुभव, संस्मरणीय घटना, आव्हानात्मक प्रसंग यांची श्रृंखला या भाषणात पाहायला मिळते. राजकीय वाटचाल करताना विविध टप्प्यांवर आलेले अनुभव, वरिष्ठांची लाभलेली साथ, स्नेह आणि मार्गदर्शन याची भावपूर्ण मांडणी तटकरेंनी आपल्या या भाषणात केलेली आहे. या पुस्तकातून सुनील तटकरे यांचा अभ्यास, चिंतन, वाचन, निरीक्षण या गुणांचं दर्शन घडतं. विधिमंडळातील भाषण हा राजकीय अभिलेख असतो, सुनील तटकरे यांच्या भाषणांमुळे त्याची संदर्भसंपृक्तता नक्की वाढेल आणि राजकारणात येणाऱया पिढीसाठी आणि राजकारणाचा अभ्यास करणाऱयांसाठी हे पुस्तक नक्कीच दीपस्तंभ ठरेल.

अभिनंदन …अभिवादन!
लेखक: सुनील तटकरे
प्रकाशक: मनीषा प्रकाशन
मूल्य: 100 रुपये