
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघने चक्क काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाच निमंत्रण देणार असल्याची माहिती आहे. गेल्याच आठवडय़ात लंडन दौऱ्यात राहुल गांधींनी संघाची तुलना थेट ‘मुस्लिम ब्रदरहुड’शी केली होती. त्यामुळे संघाने निमंत्रण दिले तर राहुल गांधी स्वीकारतील का आणि जर गेलेच तर संघाच्या कार्यक्रमात काय बोलतील याबाबत उत्सुकता आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे नागपूर येथे संघ मुख्यालयात गेले होते. तेथे प्रणवदांनी भाषणही केले. त्यावेळी काँग्रेसने प्रणवदा यांनी संघ मुख्यालयात जाऊ नये असा पवित्रा घेतला होता. दरम्यान, एकीकडे राहुल गांधींना निमंत्रणाची चर्चा सुरू असतानाच आज दिल्लीत संघाचे प्रचारप्रमुख अरुण कुमार यांनी ‘मुस्लिम ब्रदरहुड’ची तुलना केल्याबद्दल राहुल गांधींवर टीका केली. ज्यांना अजून हिंदुस्थान समजला नाही त्यांना संघ समजू शकत नाही असे अरुण कुमार म्हणाले.
17 ते 19 सप्टेंबरदरम्यान, दिल्लीतील विज्ञान भवनात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संघाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना बोलाविण्याचा विचार संघाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. संघाने थेट नावे अद्याप जाहीर केली नाहीत, मात्र राहुल गांधी आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठविले जाण्याची शक्यता आहे.
summary- does rss invite rahul gandhi for its program






















































