
भटका कुत्रा घरी आणला यावरून दोन कुटुंबीय एकमेकांना भिडल्याची घटना घाटकोपर पूर्वेकडे घडली. गुजराती कुटुंबाने मराठी कुटुंबीयांना दादागिरी केल्याचा व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आला. या प्रकरणी अदखलपात्र गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
पंतनगर येथील एका सोसायटीत हा प्रकार घडला. फार पूर्वीपासून दोन्ही कुंटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहत आहेत. मराठी कुटुंबातील सदस्याने आजारी असलेल्या एका भटक्या श्वानाला घरी आणले होते. यावरून गुजराती कुटुंबीयांनी वाद घातला. ते लोकं मराठी कुटुंबीयांना घरात घुसून दादागिरी करत होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येत होते. दरम्यान, आमच्यात भाषिक किंवा प्रांतवाद नव्हता असे तक्रारदारांचे म्हणणे असल्याचे पंतनगर पोलिसांकडून सांगण्यात आले.