
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणी दरम्यान हल्ला झाला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजेश साक्रीया असे असून, तो मूळचा गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्याची आई भानू म्हणाली की, राजेश हा श्वानप्रेमी आहे आणि दिल्ली एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना आश्रयस्थानात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिलेल्या निर्णयामुळे तो नाराज होता.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनसुनावणीवेळी कानशिलात लगावली
काही वृत्तांतांमध्ये असेही म्हटले आहे की, ४१ वर्षीय साकरीया त्याच्या नातेवाईकाला अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची मदत घेण्यासाठी सार्वजनिक सभेत गेला होता. दिल्ली पोलिसांकडून यासंदर्भातील अधिकृत माहीती मात्र उपलब्ध नाही.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, साकरीया काही कागदपत्रांसह मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. संभाषणादरम्यान तो मोठ्याने ओरडू लागला आणि नंतर त्यांच्या कानशिलात लगावली. काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की तो मद्यधुंद अवस्थेत दिसत होता, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांवर हल्ला होताच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला पकडले आणि आता दिल्ली पोलिसांनी हल्ला कशामुळे झाला याचा तपास करत असताना त्याची चौकशी केली जात आहे.
मुख्यमंत्री गुप्ता यांच्या निवासस्थानी आज सकाळी झालेल्या सार्वजनिक सुनावणीदरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी त्या नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी जनसुनावणी बैठकीत होत्या.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आतिशी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे दिल्ली पोलिस दोषींवर कठोर कारवाई करतील अशी आशा आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित असतील अशी आशा आहे. असे दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या.