
डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नव्याने नाले, गटार आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे रडतखडत सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील का, असा प्रश्न निर्माण झाला असून या भोंगळ कारभारामुळे डोंबिवलीत एमआयडीसीतील रस्ते पावसाळ्यात तुंबण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संताप व्यक्त करत तत्काळ नाल्यांची कामे मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
एमआयडीसी निवासीमधील सुदर्शननगरमधील सिस्टर निवेदिता शाळा, सुदर्शन बंगला, ओम अगत्य सोसायटी, पोटोबा हॉटेल, मिलापनगर तलाव रस्ता, सर्व्हिस रस्ता, कावेरी चौक, चार बिल्डिंग परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नाले, गटारी आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे सुरू आहेत. मात्र कंत्राटदार ही कामे धीम्या गतीने करत आहेत, तर काही भागात काम करताना झाडे, सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर्स आणि वीजवाहिन्या असल्याने कामे लटकली आहेत. मात्र प्रशासन यातून मार्ग काढत नसल्याने पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामे पूर्ण होणे अशक्य असून रस्ते तुंबण्याचा धोका आहे. याबाबत शिवसेनेचे राजे नलावडे यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.