
बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत असून घरोघर बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारामध्ये फुलं, फळं, मिठाई, सजावटीचे सामान घेण्यासाठी गर्दी उसळली आहे. तसेच अनेक घरांमध्ये एक दिवस आधीच बाप्पा आणला जातो, त्यामुळे मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांकडेही गर्दी झाली आहे. अशातच कल्याण-डोंबिवली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्याने गणेशभक्तांची पंचाईत झाली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्र आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेशभक्तांनी या कला केंद्रातून गणेश मूर्तींचे बुकिंग केले होते. मात्र गणेश चतुर्थीला अवघा एक दिवस बाकी असताना येथील मूर्तिकार फरार झाला. यामुळे गणेशभक्तांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
गणेश आगमनाला अवघा एक दिवस बाकी असताना मूर्तिकार फरार झाल्याने गणेशभक्तांनी संताप व्यक्त केला. बुकिंग केलेल्या गणेशभक्तांनी आनंदी कला केंद्रातून हाताला येईल ती मूर्ती उचलली आणि घरी नेली. काहींनी याची तक्रार पोलिसातही केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त बुकिंग घेतल्याने हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पोलीस पुढील तपास करत आहेत.