
डोंबिवलीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पालिका निवडणुकीला गालबोट लागले. डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप आणि शिंदे गटात रक्तरंजित राडा झाला. या हल्ल्यात भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भाजपने हाताला काळ्या फिती बांधून प्रभागात मूक मोर्चा काढला.
सोमवारी रात्री 11 वाजता सुनीलनगर, भगतवाडी भागात शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील आणि इतर आठ जणांनी भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. ओमनाथ नाटेकर यांच्यावर रॉड, बांबू आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याने त्यांच्या डोक्याला 20 टाके पडले आहेत. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन मुख्य आरोपी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
50 जणांचा जमाव चाल करून आला
ओमनाथ नाटेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रचारासाठी आम्ही सुनीलनगर भागात फिरत असताना 50 ते 60 जणांचा जमाव आमच्यावर चाल करून आला. यावेळी शिंदे गटाच्या नितीन पाटील यांनी ‘‘तुम्ही भाडोत्री येथे कशाला आलात, तुझी पत्नी कशी निवडून येते ते मी बघतोच. माझ्या प्रभागात प्रचाराला का येता? आज तुला कायमचा संपून टाकतो,’’ अशी धमकी देत हल्ला केला, तर नितीन पाटील यांनी ओमनाथ नाटेकर यांचे आरोप फेटाळले असून भगतवाडी भागात नाटेकर मतदारांना पैसे वाटप होते. पोलीस घटनास्थळी येताच ते पळून जात असताना पडून जखमी झाले असा दावा केला. दरम्यान, पालिकेतील सत्तेसाठी भाजप-शिंदे गट एकमेकांचे खून करतील. त्यामुळे अतिसंवेदनशील शहर म्हणून डोंबिवलीला जाहीर करा, अशी मागणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

































































