
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तींचे कुटुंबीय सध्या कोर्टकचेरीत अडकले आहेत. न्यायाधीशांच्या मुलाने आपल्या चार वर्षाच्या मुलाचा सासरे लैंगिक छळ करीत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या दोन दिवसानंतर न्यायाधीशांच्या सुनेने नवरा, दीर आणि सासू आपला हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार दाखल केली आहे.
त्यांच्या घरातील वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर न्यायाधीशांच्या मुलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की सासरच्या मंडळींच्या बाजूने पोलीस असल्याने पोलीस या प्रकरणी निष्क्रीयता दाखवत आहेत. दक्षिण मुंबईतील पोलीस ठाण्यामधून ही केस हटवून अन्य पोलीस ठाणे, क्राइम युनिट किंवा महाराष्ट्र पोलीस दलातील कोणत्याही विशेष युनिटकडे स्थलांतरीत करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत पोलीस जाणीवपूर्वक आरोपीला अटक करत नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे.
आजोबांनी किंवा अन्य कुणीही लैंगिक छळ केला नसल्याचे त्या लहान मुलाचे म्हणणे आहे. परंतु याचिकेत असे म्हणण्यात आले आहे की न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ज्या पद्धतीने मुलाचे म्हणणे नोंदवले गेले, ते पोक्सो कायद्याला धरून नव्हते. या तक्रारीबाबत 2 डिसेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुलाच्या आईने हुंड्यासाठी आपला सासरची मंडळी छळ करून धमकी देत असल्याची तक्रार नोंदविली आहे. विवाहानंतर 2014 सालापासून आपला हुंड्यासाठी छळ सुरू असल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे. सत्र न्यायालयात न्यायमूर्तींच्या कुटुंबियांनी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये आपण पोक्सोअंतर्गत तक्रार दाखल केल्याने आमच्या विरोधात तक्रार करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात या प्रत्येकाला 15 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.



























































