पिशवीसाठी 14 रुपये घेणाऱ्या डॉमिनोजला 10 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्राहकांकडून पिशवीसाठी अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी ग्राहक विवाद निवारण आयोगाने डॉमिनोज कंपनीला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. चंदिगडमधील ग्राहक आयोगाने हा निर्णय दिला आहे.

डॉमिनोजची मालकी असणाऱ्या ज्युबिलियंट फूड वर्क्स लिमिटेडला हा दंड ठोठावण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर 2019 रोजी पेशाने वकील असणाऱ्या पंकज चंगोठीया यांच्याकडून डॉमिनोजच्या आऊटलेटमध्ये पिशवीसाठी अतिरिक्त 14 रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यावर निर्णय देताना आयोगाने ग्राहकांना झालेला मानसिक त्रास आणि मनस्तापासाठी कंपनीने त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, तर ज्युबिलियंट फूड वर्क्स लिमिटेडने दंडाच्या रकमेतील 9 लाख 80 हजार रुपये चंदिगडमधील गरीब रुग्णांसाठी चालवल्या जाणाऱ्या कल्याण निधीच्या खात्यावर जमा करण्यास आयोगाने सांगितले आहे.