
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50 टक्क्यांच्या टॅरिफ बॉम्बचे हादरे आता हिंदुस्थानला जाणवू लागले आहेत. हा कर लादल्यानंतर वॉलमार्ट, अॅमेझॉन, टार्गेट आणि गॅपसारख्या प्रमुख किरकोळ विक्रेत्यांनी आता हिंदुस्थानातील ऑर्डर्स रोखून धरल्या आहेत. त्यामुळे हिंदुस्थानातील कंपन्या आणि व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.
हिंदुस्थानातील निर्यातदारांना अमेरिकन खरेदीदारांकडून पुढील सूचना मिळेपर्यंत कपड्यांची निर्यात थांबवण्याची विनंती करणारी पत्रे आणि ई-मेल्स मिळाल्याचे वृत्त आहे. हिंदुस्थानी निर्यातदारांना टॅरिफमुळे वाढत्या खर्चाचा भार सोसावा लागत आहे. या भरमसाट टॅरिफमुळे अमेरिकेत विकल्या जाणाऱया वस्तूंच्या किमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वेल्सपन लिव्हिंग, गोकलदास एक्स्पोर्ट्स, इंडो काउंट आणि ट्रायडंटसारख्या हिंदुस्थानातील प्रमुख निर्यातदार त्यांच्या 40 ते 70 टक्के वस्तू अमेरिकेत विकतात. त्यामुळे टॅरिफचा मोठ्या प्रमाणावर दणका हिंदुस्थानी व्यापाराला बसल्याचे समोर आले आहे.
चीन म्हणतेय, टॅरिफचा दुरुपयोग
हिंदुस्थानवर अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या 50 टक्के टॅरिफला चीनने विरोध केला आहे. हा टॅरिफचा दुरुपयोग असल्याचे चीनने म्हटले आहे. अमेरिकेने तंत्रज्ञान आणि व्यापारी मुद्दय़ांवर सुरू असलेले राजकारण बंद करावे, असे चीनने म्हटले आहे.
43 हजार कोटींचे नुकसान
अमेरिकेने ऑर्डर्स रोखल्यामुळे व्यापारात 40 ते 50 टक्के घट होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानातून सर्वाधिक कपडे अमेरिकेत निर्यात केले जातात. परंतु टॅरिफमुळे आणि ऑर्डर्स रोखल्यामुळे हिंदुस्थानातून केली जाणारी निर्यात आता बांगलादेश आणि व्हिएतनामला होऊ शकते. तज्ञांच्या मते यामुळे 4 ते 5 अब्ज डॉलर्सचे म्हणजेच 35 ते 43 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
हिंदुस्थानची कराराला स्थगिती
हिंदुस्थानने अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे, विमाने खरेदी करण्याचा प्रस्तावित 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 31 हजार 500 कोटी रुपयांच्या कराराला स्थगिती दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा नियोजित वॉशिंग्टन दौराही रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे हिंदुस्थान सरकारने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ट्रेड डीलवर चर्चा, ट्रम्प नकारावर ठाम
टॅरिफच्या घोषणेनंतर ट्रम्प यांनी हिंदुस्थानसोबत व्यापार करारावर चर्चा पुढेही सुरू ठेवण्यास ठाम नकार दिला. 50 टक्के टॅरिफ लादण्याच्या घोषणेनंतर व्यापार करारावर चर्चा सुरू ठेवण्यास अमेरिका उत्सुक आहे का, असा सवाल प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांना केला असता चर्चा पुढे सुरू ठेवण्यास आपण उत्सुक नसल्याचे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.