हिंदुस्थानवर निशाणा काही देश अमेरिकेला लुटताहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

हिंदुस्थानसह जगभरातील काही देश अमेरिकेला लुटत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.  काही अमेरिकी उत्पादनांवर हिंदुस्थानात १०० टक्के आयात कर आणि जकात आकारली जाते असे सांगत अमेरिकेला लुटणाऱ्या देशांशी व्यापारी संबंध तोडण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. कॅनडातील क्युबेकमध्ये जी-७ देशांच्या संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात त्यांनी संयुक्त घोषणापत्र मान्य नसल्याचे सांगितले.

आम्ही असा देश आहोत ज्याला इतर देश लुटण्याचा प्रयत्न  करत आहेत. अमेरिकी उत्पादनांवर हिंदुस्थानात १०० टक्के आयात कर आकारला जात असल्याचे सांगत ही समस्या फक्त विकसित आणि जी-७ देशांची नसून सर्वच अमेरिकेला लुटत आहेत असा आरोप त्यांनी केला. आम्ही इतर देशांकडून काहीही वसूल करत नाही. आता यापुढे आम्ही हे सहन करणार नाही असे सांगत हिंदुस्थानी बाईकवर कर वाढवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

हिंदुस्थानात हार्ले डेविडसन मोटरसायकवर आकारण्यात येणाऱ्या कराचा मुद्दा ट्रम्प यांनी अनेकदा उपस्थित करत हिंदुस्थानातील बाइकवर कर वाढवण्याचा इशारा त्यांनी याआधीही दिला आहे. कोणताही कर नको किंवा कोणतीही सबसिडी नको हे अमेरिकेचे धोरण असल्याचे ते म्हणाले. अमेरिका फर्स्ट धोरणावर जोर देताना त्यांनी सांगितले की, व्यापार शुल्क संपविणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे  ते म्हणाले.

…तर व्यापार थांबवणार !
आम्ही सर्व देशांशी करांबाबत चर्चा करत आहोत. जर हे थांबले नाही तर त्या देशांशी व्यापार थांबवण्यात येईल. अमेरिकेला त्याचा फायदाच होईल असे ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि हिंदुस्थानात चांगले संबंध असून दोन्ही देशांचा व्यापार गेल्या वर्षी ११ अब्ज डॉलरवरून १२५ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. अशा काळात ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.