हिंदुस्थानला आणखी एक झटका; डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर लावला 100 टक्के टॅरिफ, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत जगभरातील फार्मा सेक्टरमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने विदेशातून आयात होणाऱ्या ब्रँडेड औषधांवर आणि पेटंटेड प्रोडक्टवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून याची अंमलबजावणी सुरू होईल. याचा सर्वाधिक फटका हिंदुस्थानला बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेला सर्वाधिक औषधे हिंदुस्थान निर्यात करतो.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने याआधी हिंदुस्थानमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावला होता. 27 ऑगस्ट 2025 पासून हा टॅरिफ लागू झाला आहे. यामुळे कपडे, खड्यांचे दागिने, फर्निचर, मासळी उद्योग संकटात आले आहेत. अर्थात त्यावेळी ट्रम्प प्रशासनाने फार्मा सेक्टरला टॅरिफ लावलेला नव्हता, मात्र आता यावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘ट्रुथ’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी औषधांवर टॅरिफ लावण्यात आल्याची माहिती दिली.

“1 ऑक्टोबर 2025 पासून आम्ही ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावणार आहेत. फक्त अमेरिकेमध्ये औषध निर्मितीचा प्लान्ट उभारणाऱ्या कंपन्यांना यातून सूट मिळेल. उभारणाऱ्या म्हणजे सदर प्लान्टचे बांधकाम सुरू झाले असेल तर त्या कंपनीच्या औषधांवर कोणताही कर आकारला जाणार नाही”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

स्वयंपाकघरातील वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ

दरम्यान, अन्य एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्वयंपाकघरातील वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. 1 ऑक्टोबर 2025 पासून किचन ट्रॉली, बाथरूममधील उपकरणे आणि संबंधित उत्पादनांवर 50 टक्के शुल्क आकारले जाईल. यासह फर्निचरवर 30 टक्के आणि अवजड वाहनांवर 25 टक्के शुल्क आकारले जाईल. याचे कारण इतर देश मोठ्या प्रमाणात ही उत्पादने अमेरिकेत निर्यात करत आहेत. हे योग्य नसून राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

हिंदुस्थानला धक्का

अमेरिकेला जेनेरिक औषधांची सर्वाधिक निर्यात हिंदुस्थान करतो. 2024 मध्ये हिंदुस्थानने अमेरिकेला जवळपास 8.73 अरब डॉलरची औषधे निर्यात केली होती. हिंदुस्थान एकूण औषध निर्यातीपैकी 31 टक्के निर्यात अमेरिकेला करतो. अर्थात अमेरिकेने जेनेरिक औषधांवर टॅरिफ लादलेला नाही, मात्र याचा परिणाम हिंदुस्थानी कंपन्यांवर नक्कीच होईल. कारण अमेरिकेतील डॉक्टर रुग्णांना जे प्रिस्किप्शन लिहून देतो, त्यातील 10 पैकी 4 औषधी ही हिंदुस्थानी कंपन्यांनी बनवलेली असतात.