
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत असल्याचा आरोप करत हिंदुस्थानवर मोठा टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पुढील 24 तासांत हिंदुस्थानवर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, कारण हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्याचा मोठा हिस्सा आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त किमतीत विकून नफा कमवत आहे.
ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर युक्रेनमधील मानवीय संकटाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणाले, हिंदुस्थानला युक्रेनमध्ये रशियन युद्धामुळे होणाऱ्या मृत्यूंची पर्वा नाही. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “हिंदुस्थान रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे आणि त्याचा बहुतांश हिस्सा जास्त नफ्यासाठी बाजारात विकत आहे. यामुळे मी हिंदुस्थानकडून अमेरिकेत येणाऱ्या मालावर टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.”
दरम्यान, याआधी यापूर्वी ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आणि रशियन तेल खरेदीमुळे अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली होती. याशिवाय अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी मांडलेल्या एका विधेयकाला ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शवला आहे, ज्यामुळे रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवरील (उदा. हिंदुस्थान आणि चीन) अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 500 टक्के टॅरिफ लावला जाऊ शकतो. हे विधेयक ऑगस्ट 2025 मध्ये सिनेटमध्ये सादर होण्याची शक्यता आहे आणि त्याला 84 सिनेटर्सचा पाठिंबा आहे.