युक्रेनवरच्या हल्ल्याने मी चकीत झालो, पुतिन यांना ओळखण्यात चूक झाल्याची ट्रम्प यांची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यावेळेस पुतिन यांनी युक्रेनच्या सीमेवर सैन्य पाठवले तेव्हा ते वाटाघाटी करण्यासाठी दबावतंत्र वापरत असावेत असे मला वाटले होते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे मी चकित झालो आहे असे मत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. वॉशिंग्टन एक्झामिनरला मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

युक्रेनच्या सीमेवर रशियाने जेव्हा सैन्याची जमवाजमव सुरू केली तेव्हा मला असं वाटलं होतं की पुतिन यांनी वाटाघाटीसाठी कठोर मार्ग स्वीकारला आहे, मात्र तेव्हा मला तो निर्णय आवडला होता असं ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचे आणि पुतिन यांचे मधुर संबंध निर्माण झाले होते. आपण त्यांच्यासोबत जेव्हा काम केलं होतं तेव्हाचे पुतिन आणि आताचे पुतिन यात फरक असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. पुतिन बदलले असून ही संपूर्ण जगासाठी खेदाची बाब असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

ट्रम्प यांनी म्हटलंय की जो बायडेन यांनी केवळ 13 महिन्यांत जे नुकसान केले ते मी होऊ दिले नसते.ते म्हणाले कि बायडेन हे रशियाचे युक्रेनवरील आक्रमक रोखण्यात अयशस्वी ठरले. मात्र मी पुतिन यांना युद्धात जाण्यापासून रोखण्यात यशस्वी झालो असतो असा दावा ट्रम्प यांनी केला. जवळपास चार दशकात मी एकमेव असा राष्ट्राध्यक्ष होतो ज्याने अमेरिकेला कोणत्याही नवीन संघर्षात अडकवले नाही असा दावा ट्रम्प यांनी केला.

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पुतिन यांची ट्रम्प यांनी तारीफ केली होती. यामुळे त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली होती. ट्रम्प यांचे रिपब्लिकन पक्षातील सहकारी आणि माईक पेन्स आणि रॉबर्ट ओ ब्रायन यांनीही पुतिन यांचा निषेध केला आहे. रिपब्लिकन पक्ष पुतिन यांच्याप्रति सहानुभूती दाखवणाऱ्यांबद्दल दयाक्षमा दाखवणार नाही असेही या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

पुतिन यांच्याबद्दल सहानुभूती असल्याच्या आरोपांचा ट्रम्प यांनी इन्कार केला आहे. आपण जर राष्ट्राध्यक्ष असतो तर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केलाच नसता अशी वल्गना ट्रम्प यांनी केली आहे. मी पुतिन यांच्यासोबत अत्यंत कडक वागायचो मात्र त्यांच्यासोबत जगातील इतर नेत्यांप्रमाणे आपले चांगले संबंध होते असं ट्रम्प यांनी म्हटलंय.

रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर केलेले आक्रमण हे 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युरोपियन राष्ट्रावरील सर्वात मोठा हल्ला आहे. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार 30 लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. यातल्या जवळपास 18 लाख लोकांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे.