‘मला काहीच कल्पना नव्हती…’ हिंदुस्थानने दिले प्रत्युत्तर; ट्रम्प तोंडावर आपटले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका आणि युरोपने रशियाकडून तेल आयात करण्याच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानला लक्ष्य केले आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराइड, पॅलेडियम, खते आणि रसायने आयात करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर ट्रम्प तोंडघशी पडले असून ‘मला काहीच कल्पना नव्हती…’ असे सांगत मला याबद्दल माहिती नाही, मी त्याची चौकशी करेन, असे स्पष्ट करत ट्रम्प यांनी सारवासारव केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी आपल्या निवेदनात म्हटले होते की युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाकडून हिंदुस्थानने तेल खरेदी करण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी, जागतिक ऊर्जा बाजारपेठेची स्थिरता राहावी म्हणून अमेरिकेनेच हिंदुस्थानला आयात सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले होते. रशियाच्या आयातीबाबत हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते त्याची चौकशी करतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की अमेरिका स्वतः रशियाकडून खते आणि रसायने यासारखी उत्पादने आयात करते आणि अशा परिस्थितीत हिंदुस्थानला लक्ष्य करणे अन्याय्य आणि अव्यवहार्य आहे.

हिंदुस्थानने युरोपला असेही उत्तर दिले होते की, 2024 मध्ये रशियासोबतचा त्यांचा द्विपक्षीय व्यापार 67.5 अब्ज युरो होता. याशिवाय, 2023 मध्ये सेवांमधील व्यापार 17.2 अब्ज युरो इतका होता. हा त्या वर्षी किंवा त्यानंतरच्या काळात रशियासोबतच्या हिंदुस्थानच्या एकूण व्यापारापेक्षा खूपच जास्त आहे. हिंदुस्थानच्या या उत्तरानंतर ट्रम्प तोंडावर आपटले असून याची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.