
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त आयात शुल्क लादल्यापासून दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान विरोधात विधानेही केली, मात्र आता त्यांनी यू टर्न घेतला आहे. वॉशिंग्टन आणि दिल्लीत सुरू असलेल्या व्यापार चर्चेचे सकारात्मक परिणाम होतील असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच याबाबत पुढील काही आठवड्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधण्यात येईल असेही ते म्हणाले.
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार अडथळ्यांवर मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू राहील. मी लवकरच माझा जिवलग मित्र पंतप्रधान मोदींशी संवाद साधणार आहे. दोन्ही देशांसाठी सकारात्मक निष्कर्ष निघेल, यात शंका नाही, असे डोनाल्ड ट्रम्प ट्रुथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणाले.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वस्तूंवर 50 टक्के आयात शुल्क लावले होते. तसेच रशियन तेल खरेदीवर अतिरिक्त 25 टक्के दंडात्मक शुल्क आकारण्यात आले आहे. तसेही आम्ही हिंदुस्थान रशियाला चीनच्या हाती हंगामावळे असेही ट्रम्प म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात असून दोन्ही देशातील चर्चेचे दार पुन्हा सुरू होण्याची आशा आहे.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, मी नेहमी मोदींचा मित्र राहीन. ते उत्तम पंतप्रधान आहेत. काही गोष्टींमध्ये मतभेद असले तरी हिंदुस्थान-अमेरिका नाते दृढ आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.
ट्रम्प यांच्या विधानावर मोदींनीही प्रतिक्रिया दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. हिंदुस्थान-अमेरिका संबंध ‘संपूर्ण आणि जागतिक रणनीतिक भागीदारी’च्या दिशेने वाटचाल करत आहेत, असे मोदी एक्स पोस्टमध्ये म्हणाले होते.
… तर शेवट चांगला होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांचा हिंदुस्थानला इशारा