
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलॅंडवर हक्क सांगितला आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मंगळवारी अमेरिकेचा एक नवीन नकाशा शेअर केला. ज्यामध्ये ग्रीनलँडसह कॅनडा आणि व्हेनेझुएला या देशांना अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांच्या या कृतीमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये युरोपियन नेतेही दिसत आहेत. या फोटोत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेनसहित इतर काही नेते ऑफिसमध्ये बसलेले दिसत आहेत. या नेत्यांच्या मागच्या बाजूला अमेरिकेचा तो AI नकाशा लावलेला दिसत आहे.
दरम्यान, ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपियन युनियन जास्त विरोध करणार नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. फ्लोरिडा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. रशिया आणि चीनमधील वाढत्या तणावाला समोरे जाण्यासाठी ग्रीनलँड अमेरिकेच्या अखत्यारित असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डेनमार्ककडे या बेटाचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी क्षमता नसल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.
नाटोचे (NATO) सरचिटणीस मार्क रूट यांच्याशी ग्रीनलँडबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये नमूद केले. ग्रीनलँड हे राष्ट्रीय आणि जागतिक सुरक्षेसाठी आवश्यक असून या निर्णयावरून मागे हटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, एका अन्य फोटोमध्ये ट्रम्प स्वतः उपाध्यक्ष जेडी वेंस आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह ग्रीनलँडमध्ये अमेरिकन ध्वज फडकवताना दिसत आहेत, जिथे ‘ग्रीनलँड, अमेरिकन क्षेत्र, स्थापना 2026’ असा फलकही लावलेला आहे. यामुळे सध्या राजकारण तापले आहे.



























































