‘वन बिग ब्युटीफूल बिल’चे कायद्यात रुपांतर; ट्रम्प यांनी केली स्वाक्षरी, व्हाईट हाऊसमध्ये फटाक्यांची आतषबाजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी ‘वन बिग ब्युटीफूल बिल’चे (One Big Beautiful Bill Act) कायद्यात रुपांतर झाले आहे. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये या  विधेयकावर स्वाक्षरी केली.

अमेरिकेच्या 249 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्हाईट हाऊसच्या लॉनमध्ये विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात खासदार, प्रशासकीय अधिकारी आणि विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ट्रम्प यांनी हे विधेयक अमेरिकन कुटुंब आणि व्यावसायिकांसाठी नवीन सुरुवात असल्याचे म्हटले. तसेच आम्ही कर कमी करणार असून अनावश्यक खर्चात कपात करणार आहोत, यामुळे आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या ‘वन बिग ब्युटीफुल’ बिलाची मोठी चर्चा सुरू होती. याच विधेयकावरून उद्योगपती एलन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मतभेद सुरू होते. 869 पानांचे हे विधेयक आधी सिनेटमध्ये 51 विरुद्ध 50 मतांनी मंजूर करण्यात आले होते. उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी निर्णायक मत दिले होते.

त्यानंतर 3 जुलै रोजी अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधी सभागृहामध्ये हे बिल 218 विरुद्ध 214 मतांनी मंजूर झाले होते आणि त्यानंतर ते स्वाक्षरीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आले होते. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका सोहळ्यावेळी ट्रम्प यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली आणि याचे कायद्यात रुपांतर झाले. यानंतर व्हाईट हाऊसमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी करण्यात आली.

‘बिग ब्युटिफुल’ बिल लाखो लोकांच्या नोकऱ्या खाईल! एलॉन मस्क यांचा ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्लाबोल

काय आहे हे विधेयक?

या विधेयकामुळे 4.5 ट्रिलियन डॉलरच्या कपातीशी संबंधित असून यामुळे नवीन कर सवलत मिळेल आणि फेडरल नेट सेफ्टी प्रोग्राममध्ये कपात होईल. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नागरिकांवरील कराचा बोजा कमी होईल अशी अपेक्षा आहे. तसेच या विधेयकामुळे कर कपात, लष्करी खर्च आणि सीमी सुरक्षा मजबूत होईल, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.