इराणशी आता कोणतीही चर्चा नाही, नेतृत्व नष्ट झाल्यावरच युद्ध थांबेल; ट्रम्प यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, दोन्ही देशांमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. “इराणसोबत आता कोणतीही चर्चा केली जाणार नाही. हे युद्ध तेव्हाच थांबेल जेव्हा तिथले नेतृत्व पूर्णपणे नष्ट होईल,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे.

एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणकडून वारंवार होणाऱ्या चिथावणीखोर कारवाया आता सहन केल्या जाणार नाहीत. त्यांनी इराणच्या सत्ताधारी नेतृत्वावर निशाणा साधत म्हटले की, जोपर्यंत हे नेतृत्व सत्तेवर आहे, तोपर्यंत चर्चेला कोणताही वाव नाही. इराणने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत आणि प्रादेशिक दहशतवादाला दिलेल्या पाठिंब्याबाबत अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे ट्रम्प यांनी हा कठोर पवित्रा घेतल्याचे समजते.

या विधानामुळे मध्य-पूर्वेतील परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेकडे केवळ इराणला दिलेली धमकी म्हणून न पाहता, ती थेट सत्तापालटाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून पाहिले जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते आणि त्यांच्या संपूर्ण यंत्रणेला लक्ष्य करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या या भूमिकेनंतर आता इराण काय पाऊल उचलणार आणि या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.