देवासमोर अर्पण केलेले दान हे ट्रस्टचे उत्पन्न

सामना प्रतिनिधी । पुणे

दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून देवामोर अर्पण केलेल्या पैशांवर कोणत्याही खासगी व्यक्तीस हक्क सांगता येणार नाही. तसेच त्याला हिस्सा घेता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला. देवापुढील अथवा गुप्त दानपेटीतील उत्पन्न हे मंदिराच्या ट्रस्टची मिळकत असून, त्या रकमेचा विनियोग देवस्थानच्या उद्दिष्टांसाठी, भाविकांसाठी सेवा परविण्यासाठी ट्रस्टचे विश्वस्त जबाबदार आहेत, असेही आदेशात नमूद केले आहे.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव गणपती येथील पुजारी प्रसाद आणि मकरंद कुलकर्णी यांनी श्री महागणपतीसमोर थाळीमध्ये अर्पण केलेली रक्कम पूर्णत: घेण्याचा हक्क आहे, असा दावा दाखल केला होता. त्यानंतर शिरूर तालुक्याचे तहसीलदार यांच्या मध्यस्थीने गाभाऱ्यासमोर गुप्त दानपेटी ठेवण्यात आली. या पेटीतील उत्पन्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. हे सर्व उत्पन्न पुजारी म्हणून वैयक्तिकरीत्या घेण्याचा हक्क आहे, असा दावा कुलकर्णी बंधूंनी केला होता. दिवाणी न्यायालयाने पुजाऱ्यांना दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत दरमहा २५ हजार रुपये ट्रस्टने द्यावेत, असा आदेश दिला होता.

मात्र, केवळ २५ हजारच नाही, तर गुप्त दानपेटीतील पूर्ण रक्कम मिळावी यासाठी कुलकर्णी बंधूंनी या निकालाविरुद्ध पुणे जिल्हा न्यायालयात अपील केले होते. ट्रस्टतर्पेâ अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांनी काम पाहिले. पुजाऱ्यांतर्पेâ ग्रामजोशी म्हणून मिळालेल्या तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या सनदेनुसार देवाचे पुजारी म्हणून हे सर्व उत्पन्न घेण्याचा हक्क असल्याचा युक्तिवाद केला. अ‍ॅड. कदम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत देवापुढे अर्पण केलेले दान हे संबंधित ट्रस्टची मिळकत आहे. या रकमेचा विनियोग केवळ देवस्थानच्या उद्दिष्ठांसाठी करण्यात यावा, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या