पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडू नका!

119

पाळीव प्राण्यांमुळे कोरोना होतो, अशा आशयाचे सोशल मीडियावरून व्हायरल होत असलेले मेसेज चुकीचे आहेत. पाळीव प्राण्यांमुळे माणसांना कोरोनाचा संसर्ग होत नाही असे स्पष्ट करत पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडू नका, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.

हिंदुस्थानात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर मुंबईत पाळीव प्राण्यांमुळे कोरोना होतो, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत असल्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण आहे. त्यामुळे काही जणांनी पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर सोडून दिले होते. याची दखल घेत अशा तक्रारींच्या शंकांचे निवारण करण्याचे काम पालिकेकडून केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘जंगली व पाळीव प्राण्यांशी जवळीक टाळा’ अशा आशयाचे बॅनर, पोस्टर मुंबई पालिकेने लावले होते. मात्र त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्यामुळे याबाबत सुधारणा करण्यात आली. पण त्यानंतरही पालिकेचे जुने मेसेज सोशल मीडियावरून पाठवले जात असून त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने लोकांचे गैरसमज दूर करत लोकांनी पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडू नये, असे आवाहन केले आहे.

जाहिरातीबाबत गैरसमज

महापालिकेकडून कोरोनाची काळजी घेण्यासाठी लावण्यात आलेल्या जाहिरातींबाबत काही जणांकडून गैरसमज निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे त्यात सुधारणा करण्यात आली आहे. पालिकेने लावलेल्या जाहिरातींमुळे लोक पाळीव प्राणी सोडून देत असल्याचा दावा चुकीचा आहे. – पद्मजा केसकर, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

गैरसमज दूर करत पालिकेने केले आवाहन; अशा तक्रारी नाहीत

कोरोना प्राण्यांमुळे होत नाही. महापालिका तशी जनजागृती करत आहे. त्यामुळे पाळीव प्राणी सोडून दिल्याच्या तक्रारी सध्या तरी आमच्याकडे आलेल्या नाहीत. – जे. पी. खन्ना, अधिष्ठाता, पशुवैद्यकीय रुग्णालय, परळ

प्राण्यांकडे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती

अनेक सोसायटय़ांमध्ये पाळीव कुत्र्यांसह लिफ्टमधून येण्या-जाण्यास बंदी घातली आहे. काही सोसायटय़ांकडून कुत्र्यांना सॅनिटायझरने धुण्याचे, मास्क लावण्याची सक्ती केली जात आहे. पण सॅनिटायझर हे कुत्र्यांसाठी विष आहे. कारण कुत्र्यांच्या तोंडात नैसर्गिकपणे लाळ असते. ही लाळ रोगप्रतिकारशक्तीचे काम करते आणि ती त्यांचे सर्व रोगांपासून संरक्षण करते. – विजय मोहनानी, अध्यक्ष, बॉम्बे ऍनिमल राइटस्

आपली प्रतिक्रिया द्या