
सामना ऑनलाईन, मुंबई
‘मी टू’ ही मोहीम लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या पीडित महिलांसाठी आहे. त्यामुळे या मोहिमेचा कुणीही गैरवापर करता कामा नये, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले.
वास्तविक हा विषयच अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे पीडित महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून इतरांनी त्याआडून आपली मतं मांडण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा हे प्रकरण कोणते वळण घेईल ते सांगता यायचे नाही, असेही खंडपीठ म्हणाले. ‘मी टू’च्या निमित्ताने समोर आलेल्या प्रकरणांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पुरुष आणि महिला असा दोघांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करायला हवी. तसेच अशा प्रकरणात तक्रार नोंदवताना नियमावली तयार करण्याची गरज आहे, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या एका पीडित महिलेने फॅण्टम फिल्मच्या बॅनरखाली चित्रपट दिग्दर्शित करणाऱया बॉलीवूड दिग्दर्शक विकास बहलवर आरोप केले होते. हे आरोप होताच फॅण्टम फिल्म कंपनीचे पार्टनर असलेल्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्या मोटवानी यांनी या महिलेला खुले समर्थन दिले होते. त्यामुळे बहल यांनी अनुराग कश्यपसह कंपनीच्या इतर कर्मचाऱयांविरुद्ध 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.
याप्रकरणी आज दुपारी न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्या चेंबरमध्ये सुनावणी झाली. त्यावेळी पीडित महिलेने न्यायालयासमोर येण्यास नकार दिला. आपल्या अशिलाने आधीच खूप सोसलंय. त्यामुळे तिला पुन्हा आता यात पडायचे नाही. झाले तेवढे शोषण पुरेसे आहे, असे तिचे म्हणणे आहे, असे तिच्या वतीने तिच्या वकिलांनी न्यायमूर्तींना सांगितले. त्यावर जर पीडित महिलेलाच हे प्रकरण पुढे वाढवायचे नाही तर इतरांनी उगाच याबाबत उलटसुलट बोलू नये, असे न्यायमूर्ती काथावाला म्हणाले.
10 कोटींच्या दाव्याबद्दल बोलताना न्यायमूर्ती म्हणाले की, अब्रुनुकसानीच्या दाव्याचे हे प्रकरण ज्या पीडितेमुळे न्यायालयात आले आहे तीच कोर्टात यायला तयार नाही. अशा वेळी दाव्याचे प्रकरणही दोघांनी आपापसात मिटवावे, असा सल्लाही न्यायमूर्तींनी दिला.
कोर्टात निकाल लागेपर्यंत कारवाई नको!
कोर्टात निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करू नका, अशी विनंती आलोकनाथ यांनी सिने अँड आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा)ला केली आहे. लेखिका-निर्मात्या विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाणे आणि सिंटाकडेही करण्यात आलेली आहे.
- लैंगिक शोषणाचा आरोप लावलेला दिग्दर्शक लव रंजन याच्या आगामी चित्रपटातून अभिनेता रणबीर कपूर बाहेर पडला आहे.
- दिग्दर्शक विपुल शहा यांच्यावरही ‘सेक्रेड गेम’मधील अभिनेत्री एल्नाज नौरोजी हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
अर्निबन ब्लाहचा आत्महत्येचा प्रयत्न
क्वान इंटरटेनमेंट कंपनीचा सहसंस्थापक अर्निबन दास ब्लाह हा गुरुवारी रात्री वाशी खाडीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला पुलावरून ताब्यात घेतले. रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांना बोलावून त्याची समजूत घातली. त्यानंतरच मध्यरात्री 2 वाजता त्याला घरी जाऊ दिले. त्याच्यावर चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.
































































