देशाचा अभिमान असलेली एअर इंडिया विकू नका! शिवसेनेची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडिया ही देशाची आन बान आणि शान आहे. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात सरकार काही बदल घडवत असेल तर ते त्यांनी जरूर घडवावेत मात्र, एअर इंडियाचे देशवासियांचे असलेले नाते लक्षात घेता सरकारने एअर इंडिया विकू नये, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने या विधेयकावर मांडली. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना, विमान वाहतूक क्षेत्रात देशाला अजून बराच टप्पा गाठायचा असल्याचे नमूद केले. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आपण सुरक्षा व्यवस्थेत व प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्यात कमी पडत असल्याकडे लक्ष वेधत प्रवाशांची सुरक्षितता सर्वोतोपरी समजून सरकारने आमूलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात, अशी मागणी केली. त्याचबरोबर जेट एअरवेजचा प्रश्न मार्गी लावून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही सरकारने प्राधान्याने सोडवावा. जेटला वाचविण्याचे प्रयत्न सरकारने करावेत, अशी मागणीही खासदार अनिल देसाई यांनी यावेळी केली.

 

विमान कायदा संशोधन विधेयकाला राज्यसभेची मंजुरी

विमान कायदा संशोधन विधेयकाला आज राज्यसभेने मंजूरी दिली. 2006 मध्ये मुंबई व दिल्ली विमानतळाच्या खासगीकरणामुळे सरकारला 33 टक्के फायदा झाल्याचे नमूद करत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी सहा विमानतळांबाबत मोठे निर्णय घेतल्याचे सांगितले. या विधेयकामुळे देशात विमानांची सुरक्षा आणखी मजबूत होणार असून दंड वसूल करण्याची रक्कमही दहा लाखांवरून एक कोटी रूपये करण्यात आल्याचे पुरी यांनी सांगितले. या विधेयकामुळे नागरी उड्डयन महानिदेशालय, सुरक्षा कार्यालय व अपघात अन्वेषण कार्यालय या तीन नियामक संस्था अधिक प्रभावी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

 

कापूस विकास संशोधन केंद्र परभणीत सुरू करा : शिवसेनेची मागणी

मराठवाडा व विदर्भाला जोडणारा दुवा म्हणून परभणी जिह्याची ओळख आहे. परभणी जिह्यात कापसाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होते. शिवाय परभणी च्या आसपास असलेल्या जिह्यातही कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणावर होते. कापूस हे इथल्या शेतकऱयांसाठी पांढरे सोने आहे. त्यामुळे कापसाचे दर्जेदार पीक घेण्यासाठी त्याला साह्यभूत ठरेल असे कापूस विकास संशोधन केंद्र परभणी येथे सुरू करावे, अशी मागणी आज शिवसेनेनेने केली. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आज लोकसभेत नियम 377 अंतर्गत हा मुद्दा मांडला.