
हिंदुस्थानी क्रिकेट विश्वात सध्या नवनव्या अफवांचा धूर उठतोय. 2027 च्या वन डे विश्वचषकाच्या वाटचालीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जागांवर प्रश्नचिन्ह लावण्याचा सुळसुळाट काही मंडळींनी सुरू केला आहे. आणि नेमक्याच वेळी माजी कसोटीपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री बॅट, बॉल आणि माईक घेऊन मैदानात उतरले आणि त्यांनी कोहली-रोहितवर हात टाकू नका, असा इशारा त्यांच्या कारकीर्दीवर वायफळ बडबड करणाऱ्यांना दिला आहे.
एका ताज्या मुलाखतीत रवी शास्त्रीं यांनी या दोघांच्या वन डे काऱकारकीर्दीबाबत शंका घेणाऱ्यांना सडेतोड सुनावले. कोहली–रोहित यांच्या कसोटीतून आणि (जागतिक क्रिकेटमधील बदलत्या भूमिकांमुळे) त्यांच्या भूमिकांवर चर्चा सुरू असतानाच शास्त्राRनी दोन शब्दांत स्पष्ट केलं, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे वन डेचे दिग्गज आहेत. अशा खेळाडूंशी मस्ती करू नये. या दोघांना बाजूला सारण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर तो बालिशपणा आहे. खेळ अशा दिग्गजांच्या भोवतीच उभा राहतो.
‘नक्की कोण हे सुतावरून स्वर्ग गाठणारे शहाणे आहेत, असा सवाल करताच शास्त्रींनी त्यांची नावं घ्यायचं टाळलं, पण टोला मात्र चुकवला नाही. काही लोक आहेत, एवढंच मी सांगतो.’
मग पुढचा फटका थेट स्टॅण्डमध्ये भिरकावताना ते म्हणाले, ‘या दोघांनी एकदा नीट मनावर घेतलं आणि योग्य बटण दाबलं की, जे सध्या उगाच उचक्या देत आहेत ना, ते सगळे पटकन गायब होतील. कोहलीसोबत भावनिक नातं असलेले शास्त्री स्पष्टच म्हणाले, अशा महान खेळाडूंची थट्टा करू नका. ज्येष्ठ खेळाडूंवरचा दबाव वाढत असताना, 2027 विश्वचषकाचा आराखडा आखला जात असताना शास्त्रींचा हा इशारा म्हणजे निव्वळ प्रतिक्रिया नसून तो एक इशाराच आहे.’

























































