पावसाळी आजार रोखण्यासाठी घरोघरी तपासणी

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लू, लेप्टोची रुग्णसंख्या वाढतच असल्याने पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये गेल्या आठवडाभरात 2 लाख 22 हजार 500 घरांना भेटी देण्यात आल्या असून तब्बल 11 लाख 12 हजार 500 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये संशयित असलेल्या 27 हजार 923 जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मुंबईत या वर्षी पावसाने उशिरा एंट्री केली असली तरी पावसाळी आजारांचा जोर मात्र कायम आहे. संपूर्ण जुलै महिन्यात डेंग्यूचे 579, मलेरियाचे 721, लेप्टोचे 377, गॅस्ट्रोचे 1649, कावीळ 138, स्वाइन फ्लूचे 86 आणि चिकुनगुनियाचे 24 रुग्ण आढळले होते. ही रुग्णवाढ कायम असून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात मलेरिया – 226, लेप्टो – 75, डेंग्यू – 157, गॅस्ट्रो – 203, कावीळ – 6, स्वाईन फ्लू – 56 आणि चिकुनगुनियाचे 9 रुग्ण आढळले आहेत. पावसाळी आजार वाढत असल्यामुळे पालिकेकडून प्रमुख रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयांत तीन हजार बेड तैनात ठेवले आहेत, तर पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अडीच हजार उंदरांचा खात्मा

लेप्टोच्या प्रसारास उंदीर कारणीभूत ठरत असल्यामुळे खासगी संस्था आणि पालिका कर्मचाऱयांच्या माध्यमातून मूषक नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये आठवडाभरात 2593 उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये विषारी गोळय़ा टाकून 1609 तर पिंजरे लावून 984 उंदरांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी असे होतेय काम

 मलेरिया टाळण्यासाठी अॅनाफिलीस डासाची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी 6499 घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 17,733 प्रजनन स्रोतांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 691 ठिकाणी मलेरियाचा डास आढळला. कीटकनाशक विभागाकडून धूम्रफवारणीही करण्यात येत आहे.

 डेंग्यूला आळा घालण्यासाठी एडिस डासांचा शोध घेण्यासाठी 3,52,416 घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3,74,327 पंटेनरची तपासणी करण्यात आली. यामध्ये 5115 ठिकाणी एडिस डासांची ठिकाणे आढळली. ती नष्ट करण्यात आली.