आता ऑलिम्पिक पदक जिंकायचेय, कुस्तीपटू नरसिंग यादवचे ध्येय

653

वर्ल्ड ऍण्टी डोपिंग एजन्सी (वाडा) यांच्याकडून बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुंबई, कांदिवलीचा कुस्तीपटू नरसिंग यादव कुस्तीच्या रिंगणात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. याप्रसंगी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना तो म्हणाला, गेल्या चार वर्षांमधील निराशा मागे टाकत आता कुस्तीमध्ये मोठी झेप घ्यायचीय. या चार वर्षांमध्येही कसून सराव केलाय. आगामी काळात होणाऱ्या ट्रायलसाठी सज्ज झालोय. जागतिक स्पर्धा व ऑलिम्पिक या दोन्हीमध्ये पदक जिंकून महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

माझ्यासारखी परिस्थिती इतर खेळाडूंची व्हायला नको

माझ्या जेवणामध्ये कोणीतरी ताकदीची औषधे मिसळली होती. त्यामुळे मला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली. माझी ही वर्षे वाया गेली, पण यापुढे अशा परिस्थितीचा सामना इतर कोणत्याही खेळाडूला करावा लागू नये यासाठी संघटनांसह संबंधित व्यक्तींनी प्रयत्न करायला हवेत, असे नरसिंग यादव आत्मीयतेने म्हणाला.

कांदिवलीच्या साई केंद्रात सराव अन् मुंबई पोलिसांची मदत 

माझ्यावर बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर निराश झालो होतो, पण यावेळी मी नोकरी करीत असलेल्या मुंबई पोलिसांकडून मोलाचा सपोर्ट मिळाला. माझ्या अधिकाऱ्यांकडून पदोपदी मला सहकार्य करण्यात आले. तसेच कांदिवलीच्या साई केंद्रात नित्यनियमाने सराव सुरू होता. त्यामुळे चार वर्षांच्या बंदीतही मी कुस्तीपासून दूर राहिलो नाही. याचा फायदा मला झाला, असे नरसिंग यादव आवर्जून म्हणाला.

स्पॉन्सर नसतानाही…

माझ्यावर बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर स्पॉन्सरही दुरावले, पण कुस्तीवर माझे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे सराव व डाएट सुरूच ठेवला. यासाठी महिन्याला एक ते दीड लाख खर्च करावा लागत असल्यामुळे प्रचंड संघर्ष करावा लागला. माझ्या पत्नीचा सपोर्ट यावेळी अत्यंत महत्त्वाचा ठरला. आता सर्वप्रथम स्पॉन्सर बघावा लागणार आहे, जेणेकरून पुढचा प्रवास तरी व्यवस्थित होऊ शकेल, असे नरसिंग यादवने सांगितले.

74 किलो वजनी गटात सहभागी होणार

माझ्यावरील बंदी उठवण्यात आली असल्याचे कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाला कळवण्यात आले आहे. यापुढे राष्ट्रीय कॅम्पसाठी माझी निवड करावी, तसेच  74 किलो वजनी गटासाठी माझा विचार करावा असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे, असे नरसिंग यादव यावेळी म्हणाला.  74 किलो वजनी गटात कमालीची चुरस आहे. सुशील कुमार, परवीन राणा, जितेंदर किन्हा हे 74 किलो वजनी गटासाठी लढण्याची शक्यता आहे. अद्याप 74 किलो वजनी गटात एकही हिंदुस्थानचा कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे नरसिंग यादवसमोर कडवे आव्हान असेल यात शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या