
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या (NADA) अपील पॅनेलने (ADAP) उत्तेजक द्रव्य सेवन (डोपिंग) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंदुस्थानचा थाळीफेकपटू बनवीर सिंग याच्यावर तब्बल सात वर्षांची बंदी घातली आहे. शिस्तपालन समितीने (ADDP) आधी दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेत अपील पॅनेलने दोन वर्षांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी, 23 डिसेंबर 2024 रोजी मेथँडिएनोन या प्रतिबंधित स्टेरॉईडच्या चाचणीत दोषी आढळल्यामुळे बनवीरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती, यामध्ये आता आणखी दोन वर्षांची वाढ करण्यात आली असून बंदी सात वर्षे करण्यात आली आहे. मात्र, ही शिक्षा वाढवण्यामागचे अधिकृत कारण नाडाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
बनवीर सिंग (37 वर्ष) हा डोपिंगमुळे बंदीचा सामना करणारा देशातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. बनवीर आधीच एका वेगळ्या प्रकरणात दोन वर्षांची बंदी भोगत होता, कारण तो 12 महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा आपल्या ठावठिकाणाची (Whereabouts) माहिती देण्यात अपयशी ठरला होता. ही बंदी 22 डिसेंबर रोजी संपणार होती, परंतु आता नवीन निर्णयामुळे त्याच्यावरील एकूण बंदी 7 वर्षांची झाली आहे.
बनवीर सिंग व्यतिरिक्त, हिंदुस्थानाचा धावपटू (लॉन्ग डिस्टन्स रनर) हरेंद्र कुमार यालाही डोपिंगचा फटका बसला आहे. प्रतिबंधित द्रव्य ‘डार्बेपोएटिन’च्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हरेंद्रवर या वर्षी 2 ऑगस्टपासून चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्येही त्याच्यावर अशीच कारवाई करण्यात आली होती. हिंदुस्थानी क्रीडा जगतातील डोपिंगची गंभीर समस्या या दोन्ही प्रकरणांमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
























































