डॉ. आंबेडकर स्मारक दोन वर्षांत, शरद पवार यांनी केलीइंदू मिलमधील स्मारक बांधकामाची पाहणी

497

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचे 75 टक्के काम अद्याप व्हायचे आहे. देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीने हे काम हाती घेतले आहे. पण हे स्मारकाचे काम आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे तरच ते दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला वेगाने सुरुवात केली आहे. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 450 फूट उंच पुतळा उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाची पाहणी केली. एमएमआरडीएचे अधिकारी तसेच ठेकेदारांकडून कामाची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कामाच्या प्रगतीविषयी शरद पवार यांनी माहिती दिली. शरद पवार म्हणाले, चैत्यभूमी आणि डॉ. बाबासाहेबांचे स्मारक असा दुहेरी संगम हे स्मारक झाल्यानंतर आंबेडकरी जनतेला पाहायला मिळेल. हे स्मारक मुंबईसह महाराष्ट्राच्या दृष्टीने जागतिक पातळीवरील एक आकर्षणाचे महत्त्वाचे ठिकाण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नाही तर श्रीलंका, चीन, थायलंड यांसारख्या बौद्ध धर्मीय अधिक संख्येने असलेल्या देशातील नागरिकांसाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी 6 डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन व 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी प्रामुख्याने चैत्यभूमीवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. मात्र या दिवसांव्यतिरिक्तही स्मारक झाल्यानंतर गर्दी वाढेल. परदेशातून आलेली कोणतीही व्यक्ती हे स्मारक पाहिल्याशिवाय जाणार नाही.

या सरकारच्या काळात हे काम पूर्ण होतेय याचा अभिमान

सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीकडे पहिल्यांदाच आल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीकडे आल्याच्या काळातच एवढे मोठे काम सरकारच्या हातून घडत आहे. याआधी आघाडीचे सरकार असताना इंदू मिलच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात भूमिपूजन झाले आहे. पण त्यानंतर काय झाले यात जायचे नाही, पण पुन्हा आमच्याच काळात हे काम पूर्ण होत आहे. या महत्त्वाच्या कामासाठी हातभार लागत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडेही खूश आहेत. हे एक आव्हान हे सरकार पूर्ण करीत असल्याचा अभिमान असल्याचेही शरद पवार म्हणाले.

जेएनयूसारखी विद्यापीठे उभारण्यास सरकार सक्षम

स्मारकाऐवजी अन्य विकासकामांवर निधी खर्च करायला हवा होता, असे मत काही लोकांनी व्यक्त केल्याबद्दल शरद पवार म्हणाले, आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आम्ही जे बोलतो ते केलेच पाहिजे असे वाटणारा वर्गही मोठा आहे, पण जे आवश्यक आहे तेच केले जाते. जेएनयूसारखे विद्यापीठ इंदू मिलमध्ये झाले असते या प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया देताना जेएनयूसारखे विद्यापीठ उभारायचे झाले तर त्यासाठी हे सरकार सक्षम आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या