
>> डॉ. अनिकेत मुळे
(लेखक वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे सल्लागार इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट आहेत)
सणासुदीच्या काळात केले जाणारे उपवास तसेच उत्सव साजरा करताना गोड खाद्यपदार्थांवर मारलेला ताव या दोन्ही गोष्टी आरोग्यावर परिणाम करणाऱया ठरतात. विशेषतः मधुमेहींनी या काळात आपल्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देत रक्तातल्या साखरेची पातळीमध्ये समतोल साधणे आवश्यक असते. असे केले तरच मधुमेहींना सण-उत्सवाचा खरा आनंद लुटता येऊ शकतो.
टाईप 2 या प्रकारच्या मधुमेहामध्ये जीवनशैलीतले बदल हा उपचारांसाठी प्राथमिक घटक आहे. तसेच उपवास करणे हादेखील जीवनशैलीतला बदल असल्याने योग्य पद्धतीने उपवास केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक फायदे होऊ शकतात.
उत्सवांदरम्यान आपल्या ब्लड-शुगर लेव्हल्सवर लक्ष ठेवून ते ताब्यात ठेवणे गरजेचे आहे. रुग्णांनी प्रत्येक वेळी जेवणाआधी इन्शुलिनचा डोस किती घ्यायचा हे ठरवण्यासाठी आधी ब्लड-शुगर लेव्हल तपासायला हवी. असे न केल्यास बऱयाच समस्या उद्भवू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे, व्यायाम आणि त्यानुसार आहार घेतला तर नक्कीच मधुमेहींनाही सणांचा आनंद घेता येईल.
मधुमेहाच्या रुग्णांनी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिण्याने तुम्ही निरोगी राहता आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
मिठाई आणि फराळ न खाता त्याऐवजी आरोग्यवर्धक नाश्ता करावा किंवा फळे खावीत. मिठाईचा एखादा छोटा तुकडा चालू शकतो.
सामान्य चॉकलेट्सपेक्षा चांगल्या दर्जाची डार्क चॉकलेट खाल्ल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. गोड पेये टाळावीत. एखादा ग्लास पाणी किंवा शुगर फ्री ज्यूस पिऊ शकता.
व्हाइट राईसऐवजी ब्राऊन राईस खा.
बेकरीतल्या पदार्थांपासून दूर रहा. तळलेले पदार्थ खाऊ नका. सणासुदीला मिठाई आणि गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे कधीही, केव्हाही गोड पदार्थ खाल्ले जातात. काही वेळेस अति खाल्ल्याने पोट भरते आणी जेवण टाळले जाते. मात्र मिठाई ही ब्रेकफास्ट, जेवण यांना पर्याय असू शकत नाही. त्यामुळे गोडाचे पदार्थ प्रमाणातच खावेत.
उत्सवाच्या दिवसात मद्यपानसुद्धा टाळावं. कारण त्यात खूप प्रमाणात शुगर असते, ज्यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढते.
नियमितपणे आपल्या ब्लड-शुगर लेव्हल्सची तपासणी करत राहावी आणि काहीही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उत्सवादरम्यान प्रवास करताना मधुमेहींनी आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा, प्रमाण आणि पथ्यं लक्षात ठेवावीत. प्रवासात खाण्याच्या वेळा जरी बदलल्या तरी दर तीन-साडेतीन तासांनी खावे. प्रवासात आहार हलका असावा. मसालेदार, तेलकट, तिखट, हवाबंद डब्यातले पदार्थ शक्यतो टाळावेत.





























































