परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करणारा ‘तो’ डॉक्टर अखेर गजाआड

30

सामना प्रतिनिधी । जिंतूर

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी तौसिफ अन्सारी याने एका कंत्राटी परिचारिकेला कामावरून काढण्याची धमकी देत सलग दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पीडित परिचारिकेने जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर डॉ. तौसिफ अन्सारी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास तातडीने गजाआडही करण्यात आले.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एका उपकेंद्रावर सदर पीडित कंत्राटी परिचारिका 15 नोव्हेंबर 2016 पासून कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तौसिफ अन्सारी यांनी तिला वेळोवेळी रात्री-अपरात्री फोन करून त्रास दिला. तसेच शरीर सुखाची मागणी केली. दोन वर्षांपासून तिची बदली प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी येथे करण्यात आली. उपकेंद्राच्या आवारातच कर्मचारी वसाहतमधील एक निवासस्थान तिला देण्यात आले होते. या ठिकाणी डॉ.तौसिफ अन्सारी याने तिला वेळोवेळी कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देत तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर सदर परिचारिकेची अन्यत्र बदली केली. या प्रकाराचा मोठा आघात तिच्या मनावर झाला. यामुळे तिने निवास्थानातच फाशी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु याचवेळी तिचे बाळ रडू लागले. तेथे उपस्थित असलेले कर्मचारी नुरखा पठाण व पर्यवेक्षक कऱ्हाळे यांनीही तिला फाशी घेण्यापासून रोखले. त्यानंतर परिचारीकेने पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणाला वाचा पुâटली. आरोग्य विभागातील एका कर्मचारी संघटनेचे नेते कृष्णा साळवे यांनी या अन्यायाला वाचा फोडण्यास मदत केली. पीडित परिचारिकेने जिंतूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. आरोपी डॉ.तौसिफ अन्सारी याच्या विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला मध्यरात्री त्याच्या निवासस्थानातून गजाआड केले.

आपली प्रतिक्रिया द्या