आरोग्य – आरोग्याची रूपरेखा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

आहार, विहार, निद्रा यांचे संतुलन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर राखणे गरजेचे आहे. या आरोग्यसूत्राबाबत आपण जागरूक असणे हीच दीर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे.

आरोग्यपूर्ण जीवनशैली म्हणजे आहार, विहार, निद्रा यांचे संतुलन. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असलो, राहणीमान कोणतेही असले, व्यवसाय, नोकरी कोणतीही असली तरी या आरोग्यत्रयी बाबत आपण जागरूक असणे हीच दीर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे. आताची तरुण पिढी फिटनेस बाबत जागरुक आहे. मात्र सध्याची चाळीशी पार केलेली पिढी ही काहीशा आरोग्याबाबतच्या गैरसमजात आजही अडकून पडलेली दिसून येते. तेव्हा आपली आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी यासाठी या काही महत्त्वपूर्ण टिप्स. खरंतर एक लेखातून सल्ला देणे अतिशय कठीण आहे. पण सामान्यत काय करावे याची मार्गदर्शनपर रुपरेखा आपण जाणून घेऊया.

योग्य आहार
हा अत्यंत महत्त्वाचा आणि त्याचे नियोजन करायलाच हवे. नेहमीच्या जेवणात शक्यतो सर्वसमावेशक षड्रस आहार घ्यायला हवा. जंक फ़ूड टाळावे. मधल्या वेळेत फळे, सलाड्स ज्यातून भरपूर प्रमाणात फायबर मिळू शकते. लाडू हे आपल्या खाद्यसंस्कृतीचे वरदान आहे. अनेक प्रकारचे लाडू बनवून स्वत:सोबत ठेवता येतील. यातून इन्स्टंट ऊर्जा मिळते आणि फार खाल्ल्यासारखेही वाटत नाही.

योग्य विहार आणि आचार
रोजचा दिनक्रम म्हणजे घडय़ाळ नियोजनपूर्वक ठेवणे. सकाळ जितकी लवकर होईल तितके शरीर जास्त निरोगी राहील हे लक्षात घ्यायला हवे. उठल्यावर नेहमी हलका व्यायाम करावा. यात शरीराचे स्ट्रेचिंग, धावण्याचा अथवा चालण्याचा व्यायाम, हलकी वजने वापरून केलेला व्यायाम करणे जरूरीचे आहे. यासाठी योगासनांचा पर्याय हा अत्यंत उपयुक्त ठरेल . मन शांत होण्या पासून शासोश्वासावर नियंत्रण, नैराश्यापासून दूर राहण्यापाठी ओमकार, भास्त्राrका, भ्रामरी आणि प्राणायाम करावेत. तसेच पचन शक्ती योग्य रहावी म्हणून कपालभाती, कंबरदुखी, पाठदुखी होऊ नये म्हणून सर्वांगासन, वज्रासन तसेच पालथ पडून केलेले व्यायाम, सूर्यनमस्कार इत्यादी योगासने करता येण्यासारखी आहेत.
मात्र इतर काही शारीरिक व्याधी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम, डाएट करावे.

योग्य पथ्य
साधारण वयाच्या या टप्प्यावर आपण आहारात, दिनचर्येत नियम घालून घ्यायला हवेत. अवेळी खाणे, तेलकट तिखट आहार, जागरणे इत्यादी मुळे पचनािढया बिघडून जाते. याबाबत जागरूक असावे. यासाठी पंचकर्मातील बस्ती आणि विरेचन ह्या लक्षणात फायदेशीर ठरते. या टप्प्यावर निद्रानाशाचा त्रासही अनेकांना होतो. त्यातून उत्पन्न होणारे नैराश्य, उच्च रक्तदाबाचे व्याधी सुरू होतात. यासाठी जटामासू ब्राम्ही कल्याणक अशी अनेक औषधे प्रभावी आहेत पण योग्य वैद्याच्या सल्ल्याने घ्यावीत.

याचसोबत व्यसनांपासून दूर राहणे आत्यांतिक गरजेचे आहे.
औषधोपचारांचे नियोजन
वेळच्या वेळी वर्षातून एकदा तरी साखर, यकृत तपासणी, हृदय तपासणी आणि इतर अनेक तपासण्या करून घेणे उपयोगी ठरते.
जे काही करायचे आहे ते अति न करता आपल्या मर्यादेत ठेवावे ज्यामुळे जीवन सुखी आरोग्य पूर्ण राहील.
[email protected]