साहित्यातून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवायला मदत होईल – डॉ. जयंत नारळीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jayant-naralikar-1

>> विशाल अहिरराव ([email protected])

नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यानंतर सर्व स्तरातून त्याचं स्वागत झालं. एक वैज्ञानिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावर विराजमान होतो, हे फक्त महाराष्ट्रात घडू शकतं, अशा भावना व्यक्त होत आहेत. कोरोनाच्या काळात विज्ञानाचं महत्त्व जगाला पटलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन साहित्यातून जागृत व्हावा अशा उद्दात हेतूने मराठीतून विज्ञान साहित्याची निर्मिती करणारे डॉ. जयंत नारळीकर यांनी संमेलनाच्या निमित्ताने ‘दैनिक सामना’ला दिलेली ही उत्तरे.

सध्या कोरोना काळातून आपण जात आहोत. आणि विज्ञानाचं महत्त्व अधिक जाणवत आहे. अशावेळी एक वैज्ञानिक साहित्यिक म्हणून वैज्ञानिकदृष्टीकोन असलेल्या साहित्याची कमी जाणवते आहे का? अशा प्रकारचे साथरोग म्हणा किंवा कठीण आव्हानांवेळी वैज्ञानिक साहित्य कसे महत्त्वाचे ठरते?

– हे निश्चितच दिसून येते आहे की विज्ञानाची जीवनात अनेक प्रकारे गरज आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन न वापरता काही पूर्व कल्पना राबवण्यात अर्थ नाही हेही कोरोनाच्या उदाहरणातून दिसून येते. तसेच लोकांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे किती आवश्यक आहे हे दिसून आले. अर्थातच हळूहळू याचे महत्त्व समाजाला पटेल आणि आपल्याला याबाबतीत विज्ञानाचे सहाय्य लाभत राहील.

वैज्ञानिक व्यक्ती असूनही साहित्यात तुमची रुची कशी निर्माण झाली? विशेषत: साहित्यात मुक्तछंदपणा असतो. इथे विशिष्ट बंधन नसतं. पण विज्ञान आधारित गोष्टी लिहिंण क्लिष्ट असतं. अशा वेळी तुम्ही विज्ञान आणि साहित्याचा मेळ कसा घालू शकला?

– विज्ञान साहित्यात मला रुची निर्माण झाली कारण मला काही उत्कृष्ट उदाहरणे पहायला मिळाली. H.G. Wells, Arthur C. Clarke, Jules Verne आणि Fred Hoyle यांच्यासारख्याचे कार्य पाहून मला रुची निर्माण झाली की मराठी भाषेत अशा तऱ्हेचे वाङ्‍‍मय आणण्याचा प्रयत्न करूया.

साहित्य संमेलन आणि वाद हे जूनच समीकरण आहे. त्यातही काही वाद हे नेहमीचेच आहेत. तरीही आपलं मत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. शिक्षण-साहित्य हे राजाश्रित नसावं असा आग्रह आपल्या संस्कृतीत पाहायला मिळतो. मात्र साहित्य संमेलनात राजकारण्यांच्या सहभागावरून मोठा वाद होतो. यंदाही आहे. आपलं मत काय?

– ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ म्हणजे आपापसात वादविवाद केले की त्या वादग्रस्त विषयाची जास्त माहिती होते. त्यामुळे वाद असणे अपेक्षित आहे. मात्र ते कुठल्या स्तरावर आहेत हे महत्वाचे.

वादाचा आणखी एक मुद्दा म्हणजे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ याचं नाव. नाशिक जिल्ह्यातील भगूर ही सावरकरांची जन्मभूमी. सावरकरांचं साहित्यातील योगदान कधी नाकारता येत नाही. त्यांनी जेवढं प्रखर हिंदुत्व मांडलं तेवढाच विज्ञानवादी दृष्टिकोन जपण्यास सांगितला. याकडे आपण कसं बघता?

– मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आदर आहे आणि त्यांचे नाव वादाचा मुद्दा होऊ नये असे मला वाटते.

वाचन संस्कृती हरवत चालली आहे किंवा त्याकडील ओढा कमी झाला आहे, हे चित्र आपल्याला खरं वाटतं का? कमी झाली असेल तर त्याची कारण मिमांसा आपण कशी कराल? विज्ञान साहित्य त्यासाठी नवी आशा ठरेल का?

– वाचन संस्कृती हरवत चालली आहे यामागचे एक कारण असू शकते की मोबाईल, टी.व्ही., ब्लॉग, वेबपोर्टल इत्यादी साधनांमुळे वाचनाला किंवा लेखनाला वेळ द्यायला कमी उरतो. असे असले तरी मला वाटते की उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत रहावी आणि तिचे वाचनही अधिक पद्धतीने व्हावे. या अधिक पद्धती आपल्याला नव्या तंत्रज्ञानाकडून मिळू शकतील. मी वर नमूद केलेल्या साधनांचा वापर आपल्याला साहित्याच्या उत्कर्षासाठी सुद्धा करता येईल.

नव्या साहित्य प्लॅटफॉर्मविषयी आपल्याला काय वाटतं? जसं की ब्लॉग, वेबपोर्टल… यातून निर्माण होणारं साहित्य समाजाला दिशा देण्यात यशस्वी होईल असं वाटतं का? की ते अद्याप उथळ आहे? हे साहित्य प्लॅटफॉर्म आधुनिक असले तरी त्यातून देखील विज्ञान साहित्य निर्मिती तशी कमीच आहे असं वाटतं का? की Old vine in new bottle अशीच स्थिती असल्याचं आपल्याला वाटतं?

– ब्लॉग, वेबपोर्टल्स यातून निर्माण होणारं साहित्य कितपत वापरले जाते किवा कितपत उपयोगी पडेल हे काळानुसार ठरेल असे मला वाटते.

विज्ञान समजायला मातृभाषेतून शिक्षण साहित्य हे आवश्यक आहे असं तुम्ही म्हणतात ते कसं? आजच्या मराठी शिक्षण साहित्यात विज्ञाननिष्ठ साहित्याची कमी जाणवते का?

– एकूण मराठी भाषेचा उपयोग जितका जास्त होईल तितकी ही भाषा समृद्ध होईल. अर्थात त्यामध्ये मराठी भाषेतून विज्ञान शिकवणे हे आलेच. निदान त्याची आता तरी खूप गरज जाणवते.

विज्ञानाच्या दृष्टीने बाल साहित्याकडे तुम्ही कसे बघता?

– बालसाहित्य अनेक प्रकारच्या पाश्च्यात्य भाषांमधून, इंग्रजीतून पहायला मिळते, तसेच ते मराठीत उपलब्ध व्हावे असे वाटते. वैज्ञानिक दृष्टीकोन लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवायला याचा चांगला उपयोग होईल यात शंका नाही.

मराठी भाषा संपत चालली आहे असं बोललं जातं. मात्र तुम्ही स्वत: वाराणसीत राहून हिंदी प्रभावात असूनही मराठीवर तुमचं प्रभुत्व, या क्षेत्रातील तुमचं योगदान चकीत करणारं आहे. हे कसं शक्य झालं? मराठी साहित्याचा यामध्ये हातभार आहे का? आणि कसा?

– माझ्या घरी बनारसमध्ये आई वडील माझ्याशी मराठीतून बोलायचे. परंतु मित्रपरिवारासोबत माझा संवाद हिंदीमध्ये असे. त्यामुळे दोन्ही भाषांचा वापर होत राहिला. पुढे गोष्टी रूपाने वेगवेगळे समृद्ध इंग्रजी साहित्य पहायला मिळाले. या सर्व गोष्टींचा उपयोग झाला.