Blog- डॉ. कार्ल सेगन – अंतराळ वेडा शास्त्रज्ञ

>> सागर जाधव

गेल्या 400 वर्षांमध्ये जगभरातील विविध वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे मानवाला ब्रम्हांडाच्या उत्पत्तीपासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या अनेक गोष्टींची माहिती मिळाली. सोळाव्या शतकात गॅलिलिओ यांनी लावलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे आपल्या सूर्यमालेत अनेक नवीन खगोलीय मित्र जोडले गेले. 1903 साली मानवाने सर्वात पहिले विमान उडवले. यानंतर 1969 साली मानवाने ‘अपोलो-11’ या अंतराळयानाच्या साहाय्याने थेट चंद्र गाठला. अवघ्या 66 वर्षांच्या कालावधीत मानवाने ही गरुडझेप घेतली. या कामगिरीमुळे मानवाच्या मनात अंतराळाविषयी फार कुतूहल निर्माण झाले.

समुद्रातूनच जन्माला आलेल्या जीवसृष्टीला (मानवाला) समुद्राच्या खोलीमध्ये असलेल्या गोष्टींपेक्षा अंतराळातील आश्चर्यकारक खगोलांची जास्त माहिती प्राप्त झाली. खगोलशास्त्राविषयी जनसामान्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, आपण कोण आहोत? आपलं अस्तित्व का आहे? भविष्यात आपलं स्थान कुठे आहे? हे रहस्यमयी विश्व आहे तरी काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडावा, यासाठी अनेक वैज्ञानिकांनी पुढाकार घेत ब्रह्मांडाबाबत माहिती प्रसारित करण्याचं कार्य सुरू केलं. यापैकीच एक महान वैज्ञानिक म्हणजे ‘डॉ. कार्ल सेगन’!

1934 साली अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या डॉ. सेगन यांना बालपणासूनच खगोलशास्त्र आणि जीवशास्त्राची फार आवड होती. शिकागो विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर त्यांनी आपले सारे आयुष्य संशोधनातच व्यतीत केले. त्यांना स्टॅनली मिलर आणि जोशुआ लेडरबर्ग यांच्यासारख्या दिग्गज जीवशास्त्रज्ञची साथ लाभली. प्लूटो ग्रहाच्या पुढे असणाऱ्या कायपर्स बेल्टचा (खडकाळ खगोलांचा पट्टा) शोध लावणाऱ्या जेरार्ड कायपर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. अंतराळात परग्रही जीवांच्या शोधासाठी सर्वप्रथम भौतिक संदेश पाठवण्याचे श्रेय डॉ. सेगन यांना जाते. या संदेशांना ‘व्होयाजर गोल्डन रेकॉर्ड’ आणि ‘पायनीर प्लाक’ असे म्हटले जाते. 1960 नंतर सोव्हिएत संघ आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या अवकाश शर्यतीत त्यांनी नासा आणि अमेरीकन स्पेस प्रोग्राममध्ये महत्त्वपुर्ण योगदान दिले. नासाच्या ‘अपोलो’ या चांद्र मोहीमेसाठी त्यांनी अंतराळवीरांना चंद्रावर जाण्याआधी योग्य ते मार्गदर्शनही दिले. 80 च्या दशकात डॉ. सेगन यांनी सुरू केलेली ‘कॉसमॉस : अ पर्सनल वोयाज’ ही टीव्ही मालिका जगभर प्रचंड गाजली. हिंदुस्थानही दूरदर्शनवर या मालिकेचे प्रक्षेपण होऊ लागले. बिग बँग, ब्रह्मांडाचा जन्म, सुर्यमालेची निर्मिती ,जीवनाची सुरुवात, परग्रही जीवन अशा अनेक विषयांची माहिती 60 देशांमधील तब्बल 50 कोटी सामान्य जनतेपर्यंत या मालिकेच्या आधारे पोहोचू लागली. यानंतर त्यांनी ‘कॉसमॉस’, ‘द ड्रॅगन्स ऑफ ईडन’, ‘ब्रोकाज ब्रेन’, मर्म्स ऑफ अर्थ, ‘पेल ब्लू डॉट’ अशी 20 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली.

त्यांचे 600 हून अधिक वैज्ञानिक पत्रही प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘कॉन्टॅक्ट’ या बहुचर्चित सायन्स फिक्शन कादंबरीवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. 1983 साली त्यांनी ‘आण्विक हिवाळा’ हा विचार जगासमोर ठेवला. आण्विक युद्ध झाल्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यामुळे मानव प्रजाती कशाप्रकारे नष्ट होऊ शकते, हे त्यांनी सांगितले. शुक्र ग्रहावर होणारे ग्रीनहाऊस परिणाम, मंगळ ग्रहावरील वादळे, शनीचा नैसर्गिक उपग्रह टायटनवरील ढग आणि मिथेनचे सरोवरे, जीवांची उत्पत्ती असे अनेक विषय डॉ. सेगन यांच्यामुळे लोकांना समजण्यास मदत झाली. चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीचा शोध, वॉटसन आणि क्रीक यांनी केलेला डीएनएचा आविष्कार, लैंगिकता, प्रजनन, इतर जीवांचा जन्म, अशा अनेक वैज्ञानिक गोष्टीही सेगन यांनी सोप्या भाषेत मांडल्या. माकड आणि आपल्यात काय साम्य आहे तसेच माकड आणि झाडे कशाप्रकारे आपले पुर्वज आहेत, हेसुद्धा त्यांनी दाखवुन दिले. नासाच्या मरीनर, व्हायकींग आणि व्होयाजरसारख्या मोठ्या मोहीमांमध्ये त्यांचे महत्त्वपुर्ण योगदान आहे. 1977 साली नासाने ‘व्होयाजर-1’ हे यान संशोधनासाठी अंतराळात प्रक्षेपित केले होते. हे यान आजही कार्यरत असून आतापर्यंत प्लुटो ग्रहाच्या पुढे आंतरतारिकेत पोहोचले आहे. 14 फेब्रुवारी 1990 रोजी तब्बल 6.4 अब्ज किमी इतक्या अंतरावरून ‘व्होयाजर-1’ ने पृथ्वीचे एक ऐतिहासिक छायाचित्र टिपले. पृथ्वीच्या ह्याच जगप्रसिद्ध छायाचित्रावर डॉ. सेगन यांनी ‘पेल ब्लु डॉट’ हे भाषण दिले. आजही हे भाषण जगातील सर्वोत्तम भाषणांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

ते म्हणाले की, “दुरून पाहीलं तर या लहानग्या बिंदुमध्ये इतर कोणालाही रस वाटणार नाही. पण आपल्यासाठी तो निळाशार बिंदु फारच महत्त्वाचा आहे. त्या बिंदुकडे पुन्हा एकदा निरखुन पहा. ती पृथ्वी आहे, ते घर आहे, ते आपण आहोत. त्या पृथ्वीवर… प्रत्येकजण ज्याच्यावर आपण प्रेम करतो, प्रत्येकजण ज्याला आपण ओळखतो, प्रत्येकजण ज्याच्याबद्दल आपण आतापर्यंत ऐकलयं, आजपर्यंत जन्माला आलेला, अस्तित्वात असलेला प्रत्येक मानव, त्या निळ्या बिंदुवर जीवन जगला आहे.

आपण व्यक्त केलेले आनंद आणि दु:खाचे क्षण, शेकडो धर्म आणि विचारधारा, अर्थव्यवस्था, प्रत्येक शिकारी आणि अन्नाच्या शोधात असलेला जीव, प्रत्येक नायक आणि भ्याड माणुस, अनेक संस्कृतीचे निर्माते आणि विध्वंसक, प्रत्येक राजा आणि शेतकरी, प्रेमात असेलेले प्रत्येक तरुण जोडपे, प्रत्येक आई-वडील, प्रत्येक आशावादी मुले, प्रत्येक आविष्कारक आणि संशोधक, प्रत्येक नैतिकतेचे शिक्षक, प्रत्येक भ्रष्टाचारी राजकारणी, प्रत्येक सुपरस्टार, प्रत्येक सर्वोच्च नेता, प्रत्येक संत आणि प्रत्येक पापी माणुस, आपल्या प्रजातींच्या इतिहासात जन्माला आलेला प्रत्येक जीव इथे या सुर्यप्रकाशाच्या कीरणांनी ओढलेल्या धुळीच्या या छोट्याशा बिंदुवर जगलाय.

ही पृथ्वी, हा बिंदु या विशाल ब्रम्हांडाच्या कुशीत वसलेला छोटासा रंगमंच आहे. या बिंदुवर अधिराज्य गाजवण्यासाठी अनेक सम्राटांनी रक्ताच्या नद्यांचे पाट वाहीले, जेणेकरुन ते पुर्ण जगाचे मालक बनु शकतील. या पृथ्वीतलावरच्या एका कोपऱ्यापासुन ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत करण्यात आलेल्या अंतहीन क्रुरतेबद्दल विचार करा. त्यांच्यात असणारे गैरसमज, ते एकमेकांना मारण्यासाठी कशाप्रकारे उत्सुक असतात, एकमेकांचा द्वेष कसे करतात.

आपल्या अहंकारामुळे या जगात आपल्याला मानव म्हणुन काही विशेष अधिकार मिळाले आहेत, असे आपण समजतो. मात्र या विस्तीर्ण ब्रम्हांडाच्या काळ्या छायेत आपला ग्रह केवळ एक मंद प्रकाश असलेला बिंदु आहे. त्यामुळे या अंधारलेल्या विश्वात आपल्यापासुनच आपल्याला वाचवायला कोणीतरी येईल, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. या विश्वात जीवनाचं वरदान मिळालेला एकमात्र ज्ञात ग्रह म्हणजे पृथ्वी! भविष्यकाळात मानवासाठी राहण्यायोग्य पृथ्वीशिवाय कोणताही ग्रह आढळलेला नाही. कदाचित भविष्यात आपण दुसऱ्या ग्रहांवर जाऊ शकतो, मात्र त्याठीकाणी राहणं अजुनही आपल्यासाठी अशक्य आहे. आपली आवड असली कींवा नसली तरीही पृथ्वीवर राहण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे अजुनही उपलब्ध नाही.

खगोलशास्त्र मानवाला नम्र आणि एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी मदत करते, असे म्हणतात. मात्र या विश्वाच्या पसाऱ्यात असलेल्या छोट्याशा जगातही आपण कीती अहंकारी आणि मुर्ख आहोत याचे अनेक उदाहरण आपल्याला मिळतील. हे छायाचित्रही त्याचेच उदाहरण आहे. पृथ्वीचं हे लहानसं रुप एकमेकांबाबत आणखी दयाळु आणि जबाबदार होण्याची जाणीव करुन देतं. तसेच या धुलिकणांमध्ये हरवलेल्या निळ्याशार बिंदुचं संरक्षण करण्याचीही जाणीव होते, जे आपलं एकमेव घर आहे.”

या भाषणानंतर लोकांची ब्रम्हांडाबाबत, पृथ्वीबाबत, जीवांबाबत, पृथ्वीवर असलेल्या इतर गोष्टींबाबत विचार करण्याची पद्धत पुर्णपणे बदलुन गेली. आपण ताऱ्यांमध्ये असलेल्या तत्वांपासुन तयार झालो आहोत, असेही त्यांनी सांगितले होते. आपल्या शरीरात आढळणारे ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, कार्बन, हायड्रोजन हे सारे तत्त्व ताऱ्यांमध्येही असतात. यानुसार कोटीच्या कोटी प्रकाशवर्ष दुर असलेला एखादा तारा आपला पूर्वज आहे. डॉ. सेगन यांनी आपण नास्तिक असल्याचे नाकारले होते. मात्र तरीही त्यांनी पारंपरिक धर्माबद्दल साशंकता व्यक्त केली होती. त्यांच्यामते लोकांनी धर्माच्या जागी वैज्ञानिकदृष्ट्या आधारित विश्वास प्रणालीचे आकलन करावे. लोकांमध्ये धार्मिक अंतर्ज्ञानाचा अभाव असल्याचेही त्याने उघड केले. त्यामुळे नेहमी त्यांनी अज्ञेयवादी राहणेच पसंत केले होते. आपल्या सूर्यमालेत किंवा इतर एक्झोप्लॅनेट्सवर आपल्याप्रमाणेच विकसित जीवसृष्टी असू शकते, यासाठी गेल्या काही वर्षांपासून वैज्ञानिक संशोधन करत आहेत. 1896 साली निकोला टेस्ला यांनी तयार केलेल्या वायरलेस इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन सिस्टमच्या आधारे मंगळावर असलेल्या परग्रही जिवांशी संपर्क साधला जाऊ शकतो, असे सुचविण्यात आले होते. यासाठी डॉ. सेगन यांनी सर्च फॉर एक्ट्राटेरेस्ट्रिअल इंटेलिजेंसची (सेटी) स्थापना केली होती. आश्चर्य म्हणजे 15 ऑगस्ट 1977 रोजी सेटीमुळे अंतराळातुन आलेले रहस्यमयी रेडीओ सिग्नल्स तब्बल 72 सेकंद खणाणत होते. ओहीयो विद्यापीठाच्या बीग इअर रेडीओ टेलेस्कोपला हे सिग्नल्स मिळाले असुन हे ‘WOW’ सिग्नल्स म्हणुन ओळखले जातात. हे सिग्नल्स कोठुन आले, हे आजपर्यंत गुढ आहे. सामान्य जनतेपर्यंत विज्ञानाचा प्रसार करण्याचे काम डॉ. सेगन यांनी उत्कृष्टरित्या केले. ‘आजपासून 500 कोटी वर्षानंतर सुर्य आपलं रौद्र रुप धारण करुन पृथ्वीला गिळंकृत करुन टाकेल आणि ‘मानव’ नावाचा एक जीव या ब्रम्हांडात अस्तित्वात होता, याचा कोणालाही पत्ता नसेल’. पृथ्वीची सध्याची परिस्थिती पाहता त्यांचं हे भाकीत निश्चितच खरं ठरु शकतं. 20 डिसेंबर 1996 रोजी वयाच्या 62व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्यापासुन प्रभावित होऊन अनेक वैज्ञानिकांनी त्यांचं कार्य पुढे सुरू ठेवलं. यापैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे ‘नील डीग्रासे टायसन’! वैज्ञानिकांनी आज केलेलं संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार हे आपल्यासाठी उद्याचं संरक्षण आहे. त्यामुळे विज्ञानाला नाकारुन चालणार नाही. डॉ. सेगन यांच्यासारख्या वैज्ञानिकामुळे खगोलशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये युवांची ओढ वाढू लागली. अंतराळाचे कोडे सोडवण्यासाठी जगभरातुन अनेक हात पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्यात डॉ. सेगन हे मानवजातीसाठी नेहमीच एक प्रेरणास्त्रोत राहतील.

Science is an ongoing process, it never Ends. – Carl Sagan

आपली प्रतिक्रिया द्या