शिल्पवैभव – गगनराज सूर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • डॉ. मंजिरी भालेराव

सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये सूर्य या नैसर्गिक तत्त्वाचे प्रतिनिधित्व करणाऱया अनेक देवता पूजल्या गेलेल्या दिसून येतात. हिंदुस्थानीही त्याला अपवाद नव्हते. वैदिक धर्मात सूर्याची उपासना अनेक प्रकाराने केली गेलेली दिसते.

सूर्याची उपासना ही निसर्गातील एक शक्ती, तिला आवाहन करण्यासाठीचे मंत्र आणि काही विधी यापासून सुरू होऊन प्रतीकात्मक पूजा आणि पुढे मूर्तीची पूजा या टप्प्यावर आलेली सहज लक्षात येते. सिंधू संस्कृती आणि हिंदुस्थानातील प्राचीन नाणी यांच्यावर स्वस्तिक, सूर्यमंडल अशा सौर चिन्हांच्या रूपात सूर्याची उपासना होत असावी असा अभ्यासकांचा कयास आहे. पुढे इ.स.च्या 1 ल्या शतकानंतर मात्र रथ नसलेल्या मानवी रूपातील सूर्यमूर्तीची उपासना झपाटय़ाने लोकप्रिय होत होती, हे मथुरा परिसरात सापडलेल्या मूर्तींवरून लक्षात येते. या मानवी रूपातील मूर्ती अभारतीय वेशात असल्याचेही स्पष्टपणे दिसते. ज्याला ‘उदीच्य वेश’ (उत्तरेकडचा वेश) असे साधारणपणे म्हटले जाते, अशा वेशात या मूर्ती घडवलेल्या होत्या.

मथुरा येथे सापडलेल्या सूर्यमूर्ती, हिंदुस्थानातील सूर्याच्या उपासनेमध्ये परदेशी प्रभाव कसा पडला होता हे दाखवून देतात. त्यांचा उदीच्य वेश म्हणजे डोक्यावर बसकी टोपी, लांब कोट तसेच पायात गुडघ्यापर्यंत ‘गम बूट्स’ जसे असतात तसे जोडे, कमरेला पट्टा अशा प्रकारचा दिसतो. तसे पहिले तर हा वेश इराणी लोकांचा आहे. तो सूर्याला देण्याचे मुख्य कारण म्हणजे कुषाण काळात इराणमधले सूर्योपासक हिंदुस्थानात आले आणि त्यांनी येताना त्यांच्याबरोबर त्यांच्या देशातील सूर्यामूर्तीही आणली. ही गोष्ट एका रात्रीत घडली नसावी. बराच काळ हे स्थलांतर चालू असावे असे वाटते. हिंदुस्थानमध्ये प्राचीन काळापासून रूढ असलेली सूर्यपूजा ही सूर्याच्या नैसर्गिक रूपाची, नंतर प्रतीकांची होती. पण परदेशी (ग्रीकांचा हेलीओस, रोमनांचा अपोलो आणि इराणी किंवा शक लोकांचा मिहिर किंवा मिथ्र) लोकांची सूर्याच्या मूर्तींची पूजा पाहून हळूहळू हिंदुस्थानातही ती लोकप्रिय होऊ लागली. या स्थित्यंतराचे पडसाद हिंदुस्थानी साहित्यातही पडलेले दिसतात. भविष्य पुराणात याबद्दलची कथा आढळते. कृष्णाचा मुलगा सांब याला कुष्ठ झाले. ते लवकर बरे होत नव्हते. शाकद्वीपातून सूर्याची मूर्ती आणून तिची उपासना केल्यावर तो त्वचेचा विकार बरा होईल असे त्याला सांगितले गेले. त्याने तसे केल्यावर तो बरा झाला. नंतर त्याने मूलस्थान (मुलतान) इथे एक सूर्यमंदिर उभारले. त्या मंदिरात पुजारी कोण हा प्रश्न शाकद्वीपातील पुजारी आणून सोडवला. इराणमध्ये मग किंवा मागी हे सूर्यपूजक होते. त्यामुळे तेच पुजारी म्हणून योग्य होते. पण इराणमध्येच अग्निपूजक लोकही होते. या दोन गटांच्या संघर्षात हे मागी इराण सोडून बाहेर पडले होते. त्यांच्यापैकी काही हिंदुस्थानात आले तर काही युरोपात गेले. सूर्य आणि अग्नी यांच्या पूजकातील संघर्षाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे मग किंवा मागी लोक करत असलेला जादू-टोणा! त्यांच्या याच वैशिष्टय़ांमुळे ते युरोपमध्येही प्रसिद्ध होते. किंबहुना आजच्या इंग्रजी भाषेतील ‘मॅजिक’ या शब्दाच्या मुळाशी हे ‘मागी’च आहेत. पण हिंदुस्थानात मात्र त्यांच्या या वैशिष्टय़ांचे काही संदर्भ सापडत नाहीत. उलट त्यांना हिंदुस्थानातील ग्रंथांमध्ये ‘मग ब्राह्मण’ असे नाव दिलेले दिसते. सूर्यमूर्तीच्या पूजेसाठी हेच योग्य पुजारी होते. त्यांच्या सल्ल्यानुसारच या मूर्ती बनवल्या गेल्या असाव्यात. त्यामुळे ज्या प्रकारचा वेश त्यांच्या देशात घालत असत तसाच त्यांनी त्यांच्या देवाला दिला असणार, इ.स.च्या 13 व्या शतकातील कोणार्कच्या सूर्यमंदिरातील मूर्तींनाही धोतर आणि पायात जोडे घातलेले दाखवले आहेत.

हिंदुस्थानात सूर्यपूजा झपाटय़ाने लोकप्रिय झाली होती. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर या संप्रदायांचे पंचायतन मंदिर समूहातील अस्तित्व त्यांचे तत्कालीन हिंदुस्थानी धर्मातील महत्त्व स्पष्ट करते. मोढेरा, मार्तंड, कोणार्क अशी भव्य सूर्यमंदिरे इ.स. 10 वे ते 13 वे शतक या काळात तर बांधली गेलीच, पण त्याआधी काही कोरीव लेण्यांमध्ये सूर्याच्या मूर्ती किंवा प्रतीके कोरलेली दिसतात. गोव्यातील हर्वळे (Arvalem) येथील लेण्यात सूर्याचे तबकडी किंवा चक्र रूपातील चित्रण दिसते. त्याच्या पीठावर एक कोरीव लेखही आहे. त्याच्या अक्षरवटिकेवरून त्याचा काळ इ.स.चे 6 वे शतक असा ठरवला गेला आहे.

हिंदुस्थानात सूर्य हा जसा एकटा पूजला गेला तसा तो काही वेळेस इतर देवतांच्या बरोबरीने मिश्र रूपात, मिश्र मूर्तींच्या स्वरूपातही शिल्पांमध्ये आढळतो. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या बरोबरीने सूर्य हा ‘हरिहरपितामहार्क’ किंवा ‘ब्रह्मेशानजनार्दनार्क’ (ब्रह्मा, ईशान, जनार्दन आणि अर्क म्हणजे सूर्य) अशा स्वरूपातही दिसतो. आदित्यनारायण या रूपात विष्णूबरोबर तर मार्तंडभैरव या रूपात त्याचे शिवाशी एकरूपत्वही झालेले दिसते. प्रसिद्ध कलेतिहासतज्ञ डॉ. किरीट मन्कोडी यांनी मोढेरा येथील मंदिरावर केलेल्या संशोधनानुसार तिथे सूर्य आणि शिव यांची एकत्रित उपासना होत असावी. तेथील सूर्यमूर्ती, पार्वतीच्या मूर्ती आणि तीन डोकी, तीन हात व तीन पाय असलेल्या ‘अतिरिक्तांग भैरव’ या मूर्तीवरून लक्षात येते. अशाप्रकारे निसर्गातील शक्तीत मूळ असलेल्या या देवाच्या उपासनेत काळाच्या ओघात खूप भर पडली आणि तो विविध प्रकारे हिंदुस्थानभर पूजला गेला, आजही तो नित्यपूजेत आहेच.

[email protected]